काँग्रेस उमेदवारावर प्राणघातक हल्ला
By Admin | Published: February 21, 2017 02:42 AM2017-02-21T02:42:54+5:302017-02-21T02:42:54+5:30
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ ब मधील कॉँग्रेसचे उमेदवार किरण अर्जुन पवार (वय ३१,रा.नेहरूनगर पिंपरी) यांच्यावर अज्ञात
पिंपरी : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ ब मधील कॉँग्रेसचे उमेदवार किरण अर्जुन पवार (वय ३१,रा.नेहरूनगर पिंपरी) यांच्यावर अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने हल्ला केला. डोक्यात वार करण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्यांनी चपळाईने वार चुकविला. हाताला जखम झाली. ही घटना नेहरूनगर येथील पोस्ट कार्यालयाजवळ सोमवारी रात्री सव्वातीनच्या सुमारास घडली. ऐन निवडणुकीत उमेदवारावर हल्ला होण्याच्या घटनेमुळे या परिसरात दहशत असल्याचा प्रत्यय आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक मधुसूदन घुगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभाग क्रमांक ९ ब मधील कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार किरण पवार सोमवारी रात्री सव्वातीनच्या सुमारास घरी जात होते. त्या वेळी अंधारात एका अज्ञात व्यक्तीने त्यांना गाठले. डोक्यावर तलवारीचा वार केला. परंतु पवार यांनी तो चुकविला. तो वार हातावर बसला. हाताला किरकोळ जखम झाली.
प्रभाग क्रमांक ९ ब मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल भोसले, शिवसेनेचे कुणाल दिलीप जगनाडे, भाजपाचे संजय मंगोडेकर, काँग्र्रेस पक्षाचे किरण पवार, एमआयएमचे ज्ञानेश्वर पवार यांच्यासह दत्तात्रय तळेकर हे अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. या प्रभागात पहिल्यापासूनच दहशतीचे वातावरण आहे. नागरिकांच्या घरावर दगडफेक, वाहनांची तोडफोड अशा घटना याच भागात घडल्या आहेत. दोन टोळ्यांमधील गुंडांवर पोलिसांनी मोक्का, झोपडपट्टी दादा कायद्यांतर्गत तसेच तडिपारी अशा प्रतिबंधात्मक कारवाई केल्या आहेत. नेहरूनगर परिसरातील नागरिक कायम दहशतीच्या वातावरणात वावरतात. मतदानाच्या दिवशी अधिक बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)