पुरोगामित्वाच्या केंद्रस्थानी काँग्रेस
By admin | Published: February 17, 2016 01:34 AM2016-02-17T01:34:56+5:302016-02-17T01:34:56+5:30
कॉँग्रेसमधील लोक आपल्या आजूबाजूला पुरोगामित्व असणाऱ्यांना ठेवून स्वत: त्याच्या केंद्रस्थानी राहणे पसंत करतात. त्यामुळे त्यांना स्वत:चे पुरोगामित्व सिद्ध करावे लागत नाही
पुणे : कॉँग्रेसमधील लोक आपल्या आजूबाजूला पुरोगामित्व असणाऱ्यांना ठेवून स्वत: त्याच्या केंद्रस्थानी राहणे पसंत करतात. त्यामुळे त्यांना स्वत:चे पुरोगामित्व सिद्ध करावे लागत नाही. इतर लोकांचा पुरोगामित्वाचा प्रकाश त्यांच्यातून परावर्तित होतो, असे प्रतिपादन माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी केले.
शिक्षक हितकारणी संघटना आणि लोकवाङ्मय गृह यांच्या वतीने मंगळवारी आयोजिण्यात आलेल्या परिसंवादात ते बोलत होते. राकेश वानखेडेलिखित ‘पुरोगामी’ या कादंबरीवर चर्चा करण्यासाठी या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, प्रसिद्ध साहित्यिक राजन खान, डॉ. प्रकाश पवार व लेथक राकेश वानखेडे व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. मोरे म्हणाले, ‘‘भारतीय वास्तव हे जटिल असून अनेक विचारप्रणाली एकाच साच्यात बसविल्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होत आहे. पुरोगामींमध्ये अंतर्गत असणाऱ्या स्पर्धेमुळे संघर्ष वाढतो. त्यामुळे एकाच विचारप्रणालीत अनेक गट पडतात. कम्युनिझम आणि आंबेडकरवादी बुद्धिझम हे दुहेरी नाते असून त्यात समन्वय आणि संघर्ष दोन्ही आहे. जातीतील वर्ग आणि वर्गातील जाती शोधल्या तर भारतीय व्यवस्थेचे आकलन करणे अधिक सोपे होईल.’’
आंबेडकर आणि मार्क्स या दोन विचारप्रणालींमध्ये समन्वय होणे गरजेचे आहे. आंबेडकरांनी बौद्ध धर्मात धार्मिकतेच्या पलीकडे जाऊन सामाजिक आणि राजकीय संदर्भ सांगितले आहेत. आंबेडकरांचा धर्मांतराचा विचार व्यापक असून त्यात अनेक टप्पे आहेत, असे डॉ. मोरे म्हणाले.
वानखेडे, डॉ. पवार आणि उत्तम कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. डॉ. मिलिंद कसबे यांनी सूत्रसंचालन केले.
(प्रतिनिधी)