काँग्रेस पुण्यातील बंडखोरी थांबवू शकले नाहीत; परिणाम उमेदवारांवर, ही तर शोकांतिका, 'आप' ची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 12:51 PM2024-11-06T12:51:39+5:302024-11-06T12:52:00+5:30

आपने राज्यात विधानसभा निवडणुकीतही एकही उमेदवार उभा न करता आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला, आता काँग्रेस बंडखोरी थांबवू शकत नाहीये

Congress could not stop the riots in Pune Results on candidates this is a tragedy criticism of aam admi party | काँग्रेस पुण्यातील बंडखोरी थांबवू शकले नाहीत; परिणाम उमेदवारांवर, ही तर शोकांतिका, 'आप' ची टीका

काँग्रेस पुण्यातील बंडखोरी थांबवू शकले नाहीत; परिणाम उमेदवारांवर, ही तर शोकांतिका, 'आप' ची टीका

पुणे: काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमधील गटबाजीमुळेच पुण्यातील मतदारसंघांमध्ये बंडखोरी रोखण्यात अपयश आले आहे. आता याचा परिमाण अधिकृत उमेदवारांवर होईल, ही शोकांतिका आहे, अशी टीका आम आदमी पक्षाचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केली. पुण्यातील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांसमोर यातून विनाकारण आव्हान उभे राहिले आहे, असेही ते म्हणाले.

किर्दत म्हणाले की, पुण्यातील शिवाजीनगर, कसबा, कॅन्टोन्मेंट तसेच पर्वती विधानसभा या जागा आघाडीला मिळू शकतात. बरोबर तिथेच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी केली आणि अधिकृत उमेदवाराला अडचणीत आणले आहे. भारतीय जनता पक्ष प्रणीत केंद्र सरकारच्या दडपशाही धोरणाला विरोध म्हणून आम आदमी पार्टीने लोकसभेला इंडिया या काँग्रेस प्रणीत आघाडीबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. लोकसभेला उमेदवार उभे न करता पाठिंबा दिला. आता राज्यात विधानसभा निवडणुकीतही एकही उमेदवार उभा केला नाही, तर सक्रिय पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. असे असताना काँग्रेस साधी बंडखोरी थांबवू शकत नाही याचा अर्थ काय घ्यायचा, असा प्रश्नही किर्दत यांनी उपस्थित केला आहे.

बंडखोरीमुळे पुण्यात महाविकास आघाडीला धक्का? 

पुण्यातील शिवाजीनगर, कसबा, कॅन्टोन्मेंट तसेच पर्वती विधानसभा मतदार संघात काँग्रेसच्या बंडखोरीचा फायदा नक्कीच महायुतीला होणार आहे. महायुतीमध्ये भाजपच्या वरिष्ठांनी नेत्यांची मनधरणी करत माघार घेण्यास सांगितले. तसेच पुढील काळात विधानपरिषदेवर अथवा येत्या निवडणुकीत संधी दिली जाईल असे आश्वासनही दिले. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी विधानसभा लढवणाऱ्या नेत्याला पाठिंबा देण्याचे ठरवले. मात्र काँग्रेसमध्ये हे घडले नाही. नेत्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत माघार घेतली नाही. अक्षरशः काँग्रेसच्या अध्यक्षांना या बंडखोरांना अल्टिमेटम द्यावा लागला. पण तरीही त्यांनी माघार घेतली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीला पुण्यात धक्का बसण्याची शक्यता वाढली आहे.  

Web Title: Congress could not stop the riots in Pune Results on candidates this is a tragedy criticism of aam admi party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.