नव्या महापालिकेसाठी काँग्रेसचे उपोषण
By admin | Published: July 1, 2017 07:53 AM2017-07-01T07:53:25+5:302017-07-01T07:53:25+5:30
शहराभोवतालच्या ३४ गावांचा महापालिकेत समावेश करण्याचा विषय ऐरणीवर असताना काँग्रेसच्या वतीने या गावांचा समावेश महापालिकेत
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहराभोवतालच्या ३४ गावांचा महापालिकेत समावेश करण्याचा विषय ऐरणीवर असताना काँग्रेसच्या वतीने या गावांचा समावेश महापालिकेत न करता त्यांची स्वतंत्र महापालिका करावी, अशी मागणी करत त्यासाठी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. या मागणीचे निवेदन नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आले व त्याची प्रत आयुक्त कुणाल कुमार यांना देण्यात आली.
आमदार अनंत गाडगीळ, राज्य काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अभय छाजेड, सचिव संजय बालगुडे, सदानंद शेट्टी, काका धर्मावत तसेच
काँग्रेसचे अन्य पदाधिकारी यात सहभागी झाले होते. याबाबत बोलताना बालगुडे यांनी सांगितले, की पुणे महापालिकेचे आताचे क्षेत्रफळ २५० चौरस किलोमीटर आहे. या गावांचा समावेश केला तर ते साधारण ५०० चौरस किलोमीटर होईल. हा आकार मुंबई महापालिकेपेक्षाही मोठा आहे. या सर्व भागाला नागरी सुविधा पुरवणे अवघड होईल. त्यामुळे त्यांची स्वतंत्र महापालिका करणेच योग्य आहे.
गाडगीळ यांनी सांगितले, की हा विषय आर्थिक अडचणी निर्माण करणारा आहे. काही हजार कोटी रुपये या नव्या भागात पायाभूत
सुविधा निर्माण करण्यासाठी लागतील. सरकार ते देणार नाही व त्या भागातून कराद्वारे इतकी मोठी रक्कम उभी राहणे अवघड आहे. त्यामुळे पुणे महापालिकेच्या तिजोरीतून हा खर्च करावा लागेल. त्याचा परिणाम पुण्यातील विकासकामांवर होईल. म्हणूनच या सर्व परिसरासाठी स्वतंत्र महापालिका करणेच योग्य आहे. सरकारने याचा विचार करणे गरजेचे आहे.