काँग्रेस ही एक चळवळ; देशहितासाठी कार्यरत : श्रीपाल सबनीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 03:10 AM2017-08-10T03:10:48+5:302017-08-10T03:10:48+5:30
आज देशाला गांधीजींसारख्या व्यक्तिमत्त्वाच्या नेतृत्वाचा अभाव आहे. असहनशीलतेच्या नावाखाली अल्पसंख्याक आणि दलितांवर अन्याय होत आहे. अशा पद्धतीने जर समाजकंटकांनी गोरगरिबांवर अत्याचार केला तर देश अधोगतीकडे जाईल. भाजपाप्रणित सरकार हे अत्याचार रोखण्यात अपयशी ठरले आहे.
पुणे : आज देशाला गांधीजींसारख्या व्यक्तिमत्त्वाच्या नेतृत्वाचा अभाव आहे. असहनशीलतेच्या नावाखाली अल्पसंख्याक आणि दलितांवर अन्याय होत आहे. अशा पद्धतीने जर समाजकंटकांनी गोरगरिबांवर अत्याचार केला तर देश अधोगतीकडे जाईल. भाजपाप्रणित सरकार हे अत्याचार रोखण्यात अपयशी ठरले आहे. समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचे काम काही जातीयवादी शक्ती करत आहेत, त्यांचा गांधीजींच्या विचारांनीच मुकाबला केला पाहिजे, काँग्रेस ही एक चळवळ आहे आणि देशाच्या हितासाठी ती सदैव कार्यरत राहील, अशा शब्दांत देश काँग्रेसमुक्त करण्याची वल्गना करणाºया मोदी सरकारवर माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी टीकास्त्र सोडले.
१९४२ च्या ‘छोडो भारत’ आंदोलनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे काँग्रेस भवन ते टिळक पुतळा महात्मा फुले मंडईपर्यंत क्रांतिज्योत यात्रा काढण्यात आली. मंडई येथे सभा घेऊन या यात्रेचा समारोप करण्यात आला. त्या वेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या वेळी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, अभय छाजेड, कमल व्यवहारे, धनंजय दाभाडे, अजित दरेकर, बाळासाहेब दाभेकर, अविनाश बागवे, लता राजगुरू, शेखर कपोते, कमिटीचे सरचिटणीस रमेश अय्यर, सोनाली मारणे आदी विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
१९४२ च्या गांधीजींच्या चले जावच्या नाºयामुळे देशातील लाखो सत्याग्रही चळवळीमध्ये सहभागी झाले. जवाहरलाल नेहरू, मौलाना अबुल कलम आझाद, सरदार वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद यांनी गांधीजींना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्याची विनंती केली. त्यानुसार गांधीजींनी इंग्रजांना भारत सोडण्याचे आवाहन केले. ८ आॅगस्टच्या रात्री सर्व दिग्गज काँग्रेसच्या नेत्यांना अटक करण्यात आली आणि ९ आॅगस्ट १९४२ ला २३ वर्षीय युवती अरुणा असफ अली यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या गोवालिया टँक मैदान येथे तिरंगा फडकविण्यात आला. अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानातून देशात स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित झाली आहे. लोकशाहीला संपविण्याचे काम जर कोणी करीत असेल तर १२५ कोटी जनता त्यांना कधीही माफ करणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
- श्रीपाल सबनीस,
माजी अध्यक्ष, अखिल भारतीय
मराठी साहित्य संमेलन