'परदेश दौऱ्यांची संख्या हाच कामाचा निकष असता, तर वैमानिक परराष्ट्रमंत्री झाले असते'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 09:13 PM2018-04-24T21:13:05+5:302018-04-24T21:13:05+5:30
पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांवर काँग्रेस खासदार कुमार केतकरांचा टोला
पुणे: काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी पंचप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर टोला लगावला आहे. मोदी यांनी किती देशांना भेटी दिल्या, यावरून परराष्ट्र धोरण यशस्वी ठरत नाही. तसं असतं तर वैमानिकांना परराष्ट्रमंत्री केलं असतं, असा टोला केतकर यांनी लगावला.
पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना कुमार केतकर यांनी पंतप्रधान मोदींवर शाब्दिक हल्ला चढवला. रिझर्व्ह बँक, नोटाबंदीचा निर्णय, रघुराम राजन यांचा राजीनामा या सर्वच मुद्यांवरुन त्यांनी मोदींवर तोफ डागली. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी करून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं अवमूल्यन केलं. त्यांनी नोटाबंदीचा निर्णय घेऊन हेराफेरी केली,' असा थेट आरोप त्यांनी केला. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा उपस्थित होते.
रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या राजीनाम्यावरुनही केतकर यांनी मोदींवर तोंडसुख घेतलं. 'ज्या रघुराम राजन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा देण्यास भाग पाडलं ते आता बँक ऑफ इंग्लडचे प्रमुख होऊ शकतात,' असा दाखला केतकर यांनी दिला. 'मोदींनी स्वतंत्र दहशत यंत्रणा तयार केली आहे. काही दिवसांनी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही मागे टाकतील. त्यांच्यात आणि संघात दहशतीची स्पर्धा सुरू आहे,' असंही ते म्हणाले. केंद्र सरकारच्या कॅबिनेटच्या बैठकीत मोदी स्वतः घेतलेल्या निर्णयांची पानं पत्त्यासारखी मंत्र्यांच्या हाती देतात. भारताला असा खोटारडा पंतप्रधान भविष्यात कधीही मिळू नये, असंही केतकर यांनी म्हटलं.