कॉँग्रेस-राष्ट्रवादी आज पुन्हा बैठक
By admin | Published: January 22, 2017 04:49 AM2017-01-22T04:49:51+5:302017-01-22T04:49:51+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ११६-४६च्या प्रस्तावाला उत्तर म्हणून काँग्रेसने १०१-६१चा प्रस्ताव तयार केला असल्याचे समजते. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सल्ल्याने तयार केलेल्या या प्रस्तावाला
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ११६-४६च्या प्रस्तावाला उत्तर म्हणून काँग्रेसने १०१-६१चा प्रस्ताव तयार केला असल्याचे समजते. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सल्ल्याने तयार केलेल्या या प्रस्तावाला वरिष्ठ नेत्यांनीही मान्यता दिली असून, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर होणाऱ्या बैठकीत त्यावर चर्चा होईल, असे सांगण्यात आले. ही बैठक शनिवारी रात्री उशिरा किंवा रविवारी होण्याची शक्यता आहे.
महापालिका निवडणुकीसाठी आघाडी करायची किंवा नाही, यातच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमधील चर्चा अडकली आहे. ११६ जागा राष्ट्रवादी काँग्रेस व ४६ जागा काँग्रेस असा प्रस्ताव राष्ट्रवादीकडून काँग्रेसला देण्यात आला होता. त्यावर काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे चर्चेला पायबंद बसला.
राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांनी काँग्रेसचे शहराध्यक्ष
रमेश बागवे यांच्या निवासस्थानी जाऊन
ही कोंडी फोडली. त्या वेळी कोणत्या
पक्षाचे कोणत्या जागांवर वर्चस्व आहे
याचा प्रस्ताव तयार करण्याचे ठरले
होते. त्यानंतर संयुक्त बैठक झाली नाही; पण दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्रपणे बैठका घेतल्या. (प्रतिनिधी)
निम्म्याच प्रभागावर चर्चा
काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे आणि राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष अॅड़ वंदना चव्हाण यांनी शनिवारी प्रभागनिहाय चर्चेला सुरुवात केली़ सुमारे २ तास चाललेल्या या चर्चेत ४१ प्रभागापैकी अर्ध्याच्या प्रभागांवर चर्चा पूर्ण झाली़ त्यानंतर उरलेल्या प्रभागावर रविवारी पुन्हा चर्चा करण्याचे ठरविण्यात आले़
काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी इतक्या कमी जागांवर आघाडी मान्य करू नये, असा आग्रह धरला. पालिकेतील पक्षाचे गटनेते अरविंद शिंदे
यांनी तर जाहीरपणे विरोध दर्शवून पक्षाला
चांगली संधी आहे, असे मत व्यक्त केले. बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अडचणीत आहे;
त्यामुळे आघाडीसाठी आग्रही आहे, असे सांगितले. मागील ५ वर्षांत त्यांनी सत्तेत बरोबर घेऊन काँग्रेसची फक्त फसवणूकच केली आहे; त्यामुळे जागा वाढवून मागाव्यात, असे त्यांनी सुचविले.
त्याप्रमाणे शिंदे व अन्य काही पदाधिकाऱ्यांनी १०१ व ६१ असा प्रस्ताव तयार केला आहे. काँग्रेसची आरपीआयच्या कवाडे गटाबरोबर युती आहे. ६१ मधील काही जागा त्यांना देता येतील अशा घ्याव्यात, असेही सुचविण्यात आले. हा प्रस्ताव घेऊन आता काँग्रेसचे शहराध्यक्ष बागवे तसेच प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष खासदार चव्हाण यांची भेट घेणार आहेत.
आघाडीबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या असून लवकरात लवकर
त्याबाबत योग्य तो निर्णय घेण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- रमेश बागवे,
शहराध्यक्ष कॉँग्रेस
काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत शनिवारी रात्री अर्धवट चर्चा झाली. या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. दोन दिवसांत पुन्हा चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे.
- खासदार वंदना चव्हाण, शहराध्यक्षा, राष्ट्रवादी