काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा १५ दिवसांत होणार निर्णय
By admin | Published: April 8, 2015 03:49 AM2015-04-08T03:49:05+5:302015-04-08T03:49:05+5:30
महापालिकेत विविध विषय समित्यांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेला दोन समितीची अध्यक्षपदे देत काँग्रेसची सोबत तोडल्याने रा
पुणे : महापालिकेत विविध विषय समित्यांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेला दोन समितीची अध्यक्षपदे देत काँग्रेसची सोबत तोडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर असलेली आघाडी तोडावी, अशी ठाम भूमिका काँग्रेसच्या नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या समोर मांडली. यावर येत्या १५ दिवसांत यावर निर्णय घेऊ, असे चव्हाण यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये स्पष्ट केले.
स्थायी समितीचे अध्यक्षपद यंदा काँग्रेसला देण्याचे ठरले असताना राष्ट्रवादीने शब्द पाळला नाही. विषय समित्यांच्या निवडणुकीमध्येही मनसेला सोबत घेत काँग्रेसला बाजूला ठेवले. या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेसतर्फे राष्ट्रवादीसोबतची आघाडी तोडावी, असे पत्र अशोक चव्हाण यांना पाठविले होते. त्याबाबतची मते जाणून घेण्यासाठी चव्हाण यांनी मुंबईत बैठक घेतली. या वेळी काँग्रेसचे गटनेते व विरोधीपक्षनेते अरविंद शिंदे, शहराध्यक्ष अॅड. अभय छाजेड यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. पालिकेच्या २०१२ मधील निवडणुकीनंतर राष्ट्रवादी व काँग्रेसने आघाडी करून सत्ता स्थापन केली होती. ठरलेल्या सूत्रानुसार महापौरपद राष्ट्रवादी, काँग्रेसला उपमहापौरपद आणि एक-एक वर्ष स्थायी समितीचे अध्यक्षपद देण्यात येणार होते.