काँग्रेसमधील उद्रेक कार्यकर्त्यांमध्येही
By admin | Published: March 30, 2017 02:49 AM2017-03-30T02:49:26+5:302017-03-30T02:49:26+5:30
आधी आमदार अनंत गाडगीळ, नंतर नवनियुक्त नगरसेवक व आता ब्लॉक अध्यक्ष, पुण्याबाहेरच्या व पुण्यातील स्थानिक
पुणे : आधी आमदार अनंत गाडगीळ, नंतर नवनियुक्त नगरसेवक व आता ब्लॉक अध्यक्ष, पुण्याबाहेरच्या व पुण्यातील स्थानिक नेत्यांविरुद्धचा काँग्रेसमधील असंतोष आता थेट कार्यकर्त्यांपर्यंत झिरपला आहे. ‘किती दिवस तेच तेच चेहरे पहायचे? नव्यांना संधी देणार आहात की नाही?’ असा उद्विग्न सवाल काही ब्लॉक अध्यक्षांनी थेट प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनाच विचारला आहे.
या कार्यकर्त्यांनी चव्हाण यांची मुंबईत जाऊन भेट घेतली व त्यांच्याकडे आपले गाऱ्हाणे मांडले. पक्षाच्या कोथरूड ब्लॉकचे अध्यक्ष विजय खळदकर यांच्या नेतृत्वाखाली शिवराज भोकरे, सतीश पवार, सुनील घाडगे, सतीश शिंदे, राजेंद्र भुतडा यांनी चव्हाण यांची मुंबईत भेट घेतली. पराभवाला पक्षाचे आजी-माजी आमदार जबाबदार असल्याची तक्रार त्यांनी चव्हाण यांच्याकडे केली आहे. काँग्रेसने प्रचाराचे नेटके नियोजन केले नव्हते. पक्षाचे आजी-माजी आमदार प्रचारासाठी फिरकलेच नाहीत. उमेदवारांना नेत्याविनाच प्रचार करावा लागला. वर्षानुवर्षे ज्या प्रभागांमध्ये पक्षाची मते वाढत नव्हती अशा प्रभागांमध्येही मते वाढली आहेत. मात्र, स्थानिक नेतृत्व त्याची दखल घेत नाही. तेच-तेच चेहरे दिले जातात. आता किमान स्वीकृत सदस्यासाठी तरी नव्या चेहऱ्यांचा विचार करावा, अशी मागणी करण्यात आली.
(प्रतिनिधी)
विभागनिहाय बैठका घेणार
महापालिका निवडणुकीतील दारुण पराभवामुळे पक्षात असंतोषाचा लाव्हा भडकला आहे. त्याला सर्वांत आधी आमदार अनंत गाडगीळ यांनी जाहीरपणे तोंड फोडले.
पक्षात दिवाणखाना संस्कृती, हॉटेल कल्चर निर्माण झाले आहे; त्यामुळेच महापालिकेत पराभव झाला. काँग्रेस भवन ओस पडले. निवडणुकीच्या महिनाभराच्या कालावधीत काँग्रेस भवनमध्ये एकही बैठक झाली नाही. नको ते पुढारी पुण्यात रस घेऊ लागले आहेत, अशी जाहीर टीका करीत गाडगीळ यांनी स्थानिक नेतृत्वाबरोबरच प्रदेशच्या नेत्यांचेही वाभाडे काढले.
या सर्व गोष्टींची अखिल भारतीय काँग्रेस महासमितीकडे तक्रार केली असल्याचेही त्यांनी सांगितले. पक्षाची बांधणी करण्यासाठी लवकरच शहरात विभागनिहाय बैठका घेणार असल्याचे गाडगीळ यांनी जाहीर केले आहे.