तिसऱ्या लाटेच्या प्रतिकाराची काँग्रेसची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:11 AM2021-05-13T04:11:32+5:302021-05-13T04:11:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : प्रदेश काँग्रेसच्या आदेशावरून सर्व शहर व जिल्हा काँग्रेस समित्यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रतिकार करण्याची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : प्रदेश काँग्रेसच्या आदेशावरून सर्व शहर व जिल्हा काँग्रेस समित्यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रतिकार करण्याची तयारी सुरू केली आहे. त्याअंतर्गत बुधवारी झालेल्या शहर काँग्रेसच्या बैठकीत शहरातील कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनचे नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
काँग्रेस भवनमध्ये बुधवारी दुपारी ही बैठक झाली. शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, दीप्ती चवधरी, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी तसेच अँड. अभय छाजेड, नगरसेवक अरविंद शिंदे, अविनाश बागवे आदी बैठकीला उपस्थित होते. कोरोनाची तिसरी लाट आली तर संपूर्ण व्यवस्था कोलमडून पडेल, त्यावर काय करता येतील यावर बैठकीत चर्चा झाली.
ऑक्सिजन उत्पादकांबरोबर करार करून काही ऑक्सिजन सिलिंडर बुक करून ते बेड न मिळालेल्या गरजू रुग्णांना घरी पुरवता येतील. तसेच शक्य असेल तर एखाद्या उत्पादकाला तात्पुरत्या कराराने काँग्रेस आवारातील जागा देऊन तिथे त्याला लहान प्रकल्प तात्पुरत्या स्वरूपात सुरू करायला सांगता येईल. याविषयी माहिती घेण्याची जबाबदारी शिंदे व नगरसेवक बागवे यांना देण्यात आली.
टाळेबंदीमुळे निराधारांचे तसेच वयोवृद्धांचे खाण्याचे हाल होतात. त्यांच्यासाठी जेवणाच्या वेळेत रोजचे किमान दोन तास अन्नछत्र सुरू करावे, असे मत मोहन जोशी यांनी व्यक्त केले. तिवारी यांनी रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना शहरातील रुग्णालयांची अद्ययावत माहिती मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाला महापालिकेवर दबाव आणण्यास सांगण्याचे सुचवले. कोरोना निर्मुलनासाठी काँग्रेसच्या आजीमाजी लोकप्रतिनिधींनी पक्षाला अर्थसाह्य करावे, पक्ष कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात कोरोना रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांना मदत करावी, असे आवाहन बागवे यांनी केले.