आर्थिक, सामाजिक विकासाची जबाबदारी काँग्रेसवरच
By admin | Published: December 28, 2015 01:32 AM2015-12-28T01:32:42+5:302015-12-28T01:32:42+5:30
देशाच्या स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकून अहिंसेच्या मार्गाने पुढे जात या देशाला स्वातत्र्य मिळवून देण्याचे ऐतिहासिक जबाबदारी काँग्रेसने पार पाडली आणि सन १९४७ पासून या देशाचे सार्वभौमत्व हाच
देशाच्या स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकून अहिंसेच्या मार्गाने पुढे जात या देशाला स्वातत्र्य मिळवून देण्याचे ऐतिहासिक जबाबदारी काँग्रेसने पार पाडली आणि सन १९४७ पासून या देशाचे सार्वभौमत्व हाच श्वास असे मानून काँग्रेस पक्ष वाटचाल करीत आहे.
या वर्धापनदिनानिमित्त थोडे मागे वळून पाहताना लक्षात येते, की भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये लोकशाहीची पाळेमुळे खोलवर रुजली गेली. ती केवळ काँग्रेस पक्षामुळेच! आपल्यापासून वेगळे होत निर्माण झालेले पाकिस्तान आणि बांगला देश येथील राजकीय अस्थिरता, लष्करशाहीचा प्रभाव, धार्मिक असहिष्णुता आदी बाबी लक्षात घेता काँग्रेस पक्षामुळे भारतात कायमस्वरुपी लोकशाही दृढ झाली. ही फार मोठी जमेची बाजू मानावी लागेल.
काँग्रेस पक्षाने देशाला आतापर्यंत पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहाद्दूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंह राव, डॉ. मनमोहन सिंग असे दूरदृष्टीचे नेते पंतप्रधान म्हणून दिले. या प्रत्येक पंतप्रधानांच्या कारकिर्दीत देशाच्या विकासाचा पाया अधिकाधिक भक्कम होत गेला. राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव आणि सामाजिक समता ही विचारांची त्रिसूत्री काँग्रेसनेच जनमाणसात रुजविली. त्यामुळेच आपल्या देशाची घटना सेक्युलर राहिली व ती तशीच कायम राहील. याचे श्रेय निश्चितच काँग्रेस पक्षाला जाते.
पंचवार्षिक योजना, पंचशील तत्त्वे, अलिप्त राष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती, तनखेबंदी, बँकांचे राष्ट्रीयीकरण, सार्वजनिक उद्योग, ८.३३ टक्के बोनस, बांगला देशनिर्मिती, हरितक्रांती, सहकार चळवळ, पोखरण अणुस्फोट, संगणक क्रांती, परम संगणक, अंतराळवीर राकेश शर्मा, रंगीत टीव्ही, मारुती उद्योग, बॉम्बे हाय, मुक्त अर्थव्यवस्था, सर्वधर्मसमभाव, पंचायत राज, अल्पसंख्याक दर्जा, आरक्षण धोरण, महिलांसाठी राखीव जागा, मुलींना मोफत शिक्षण, १८ वर्षे युवकांना मतदान हक्क, माहितीचा अधिकार, अन्नसुरक्षा कायदा, जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहर पुनर्निर्माण योजना, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजना, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजना, गरिबांसाठी मोफत घरकुले- राजीव गांधी आवास योजना, रोजगाराची हमी.
विविध जाती, धर्म, पंथ, भाषा, प्रांत यात विभागलेल्या आपल्या देशाची एकात्मता बळकट ठेवणं आणि त्याचबरोबर जनतेला आधार मिळेल, न्याय मिळेल, असे सर्वव्यापी उपक्रम राबवून जनतेचे जीवनमान उंचवणे आणि आर्थिक पाया मजबूत करीत आपला देश महासत्ता होण्यासाठी वाटचाल करणे. ही सारी ध्येयधोरणे काँग्रेस पक्षाने राबविली. त्यातील विविधता आणि दूरदृष्टी लक्षात घेतली की, मन थक्क होते.
ही सारी काँग्रेसच्या धोरणांची जंत्री पाहून मन थक्क होते. हरित क्रांती हा एक टर्निंग पॉर्इंट मानला जातो. भाक्रानानगल धरणाची निर्मिती करून सारे पंजाब धान्याचे कोठार बनविणे व त्याद्वारा देशाची गव्हाची गरज भागविणे हे मोठे काम काँग्रेस पक्षाने केले.
पूर्वी ३०-४० कोटी लोकसंख्या असणारा आपला देश परदेशातून धान्य आयात करायचा आता सुमारे १२५ कोटी लोकांना पुरेसे धान्य निर्माण करून धान्याची निर्यातदेखील आता आपला देश करू लागला आहे. याचे सारे श्रेय काँग्रेस पक्षाचेच आहे.
दुसरा टर्निंग पॉर्इंट बांगला देशाची निर्मिती. १९७१ मध्ये जुलमी पाकिस्तानी, पंजाबी राजवटीविरुद्ध पूर्ण १०-१५ वर्षे आधीच २१ व्या शतकाच्या यादीत नेवून ठेवले. पोखरणचा अणुस्फोट, मुक्त अर्थव्यवस्था हे देखील फार मोठे टर्निंग पार्इंट मानावे लागतील. तसेच २००४ पासून डॉ. मनमोहन सिंगांच्या नेतृत्वाखाली देशाच्या आर्थिक विकासाला प्रचंड गती देऊन ७.५ टक्केच्या वर विकासदर कायम ठेवणे आणि त्याचबरोबर समाजात मागे पडलेल्या दलित, मागासवर्गीय, अन्य मागासवर्गीय, अल्पसंख्यांक, आदिवासी, भटके विमुक्त आदींसाठी सामाजिक सौख्याच्या विविध योजना राबवून घेणे हे देखील ऐतिहासिक काम काँग्रेसने केले. २००४ पासून सलग दहा वर्षे काँग्रेस पक्षाध्यक्षा श्रीमती सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांनी उत्तम आणि स्थिर कारभार करून देशाच्या विकासाचा सदैव ७.५ टक्क्यांच्या वर ठेवला. या काळात परदेशी गुंतवणूक वाढली, देशी बचत वाढली, २००८ च्या जागतिक मंदीतही भारताची आर्थिक व्यवस्था टिकून राहिली. अणुकरारासारखा महत्त्वाकांक्षी करार मनमोहनसिंगांनी केला. आंतरराष्ट्रीय राजकारणात देशाचा दबदबा आणि पत वाढविली.
स्व.पंतप्रधान इंदिरा गांधी व स्व.पंतप्रधान राजीव गांधी यांनी केलेले बलिदान आणि पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी केलेला त्याग ही फार मोठी शिदोरी काँग्रेस पक्षाला पुढे नेत आहे. काँग्रेसचे नाते सत्तेशी नाही, तर जनतेशी आहे. ही भावना प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याच्या मनात आजही तेवत आहे. त्यामुळे सत्ता असो अथवा नसो काँग्रेस कार्यकर्ते सदैव कार्यरतच दिसतील. ‘काँग्रेस मुक्त भारत’ अशी सवंग घोषणा देणाऱ्यांना काँग्रेस पक्ष कधीच संपणार नाही. उलट फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा भरारी घेईल. हे या देशातील जनताच आपल्या कृतीतून दाखवून देईल, हा मला विश्वास आहे.
या पुढील काळ अधिक कसोटीचा असून, देशाची राष्ट्रीय एकात्मता टिकवत सर्वधर्मसमभावाची भावना वृद्धिंगत करत, सामाजिक समतेचा झेंडा हाती घेत, महत्त्वाकांक्षी आर्थिक विकासावर भर देत देशाला महासत्ता बनविण्याचे स्वप्न काँग्रेस पक्षाने बघितले आहे आणि सर्वांनाच बरोबर घेत संहिष्णुता वाढवत काँग्रेस पक्ष आपल्या देशाची ही वाटचाल पुढील काळात समर्थपणे पार पाडत राहील. जनतेच्या हृदयात काँग्रेस पक्षाबद्दल जे प्रेम व आपुलकी आहे, ती लक्षात घेता काँग्रेस पक्षावर या देशाने फार मोठी जबाबदारी टाकली आहे, असेच म्हणावे लागेल. आणि काँग्रेस पक्षाध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्या कणखर नेतृत्वाखाली आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष युवा नेते राहुल गांधी यांच्या तडफदार संघटन कौशल्याच्या आधारेही ऐतिहासिक जबाबदारी काँग्रेस पक्ष निश्चित पार पाडेल, असा मला विश्वास वाटतो. या जबाबदारीत काँग्रेस पक्ष निश्चित यशस्वी होईल. किंबहुना हे अवजड शिवधनुष्य लिलया पेलण्याचे सामर्थ्य काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये निश्चित आहे. हा विश्वास मी व्यक्त आणि राज वर्धापनदिनानिमित्त कोट्यावधी काँग्रेस कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो.