पुण्यात काँग्रेसही करणार प्रभूरामाची महाआरती- मोहन जोशी
By राजू इनामदार | Published: January 20, 2024 05:55 PM2024-01-20T17:55:58+5:302024-01-20T17:56:16+5:30
काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी २२ जानेवारीला रहाळकर श्रीराम मंदिरात दुपारी १२ वाजता महाआरतीचे आयोजन केले आहे....
पुणे : न्यासाच्या निमंत्रणानंतरही अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन कार्यक्रमाला श्रीरामाचा राजकीय वापर होत असल्याचे कारण देत उपस्थित राहण्यास काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने नकार दिला आहे. स्थानिक नेतृत्वाने त्याची री ओढत त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यातूनच काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी २२ जानेवारीला रहाळकर श्रीराम मंदिरात दुपारी १२ वाजता महाआरतीचे आयोजन केले आहे.
जोशी यांनी सांगितले की, श्रीरामाविषयी सर्व भारतीयांच्या मनात श्रद्धा आहे. श्रीराम हे दैवत प्रत्येक भारतीयाचे आहे, कोणा विशिष्ट व्यक्ती अथवा समूहाचे नाही व कोणा पक्षाचे अथवा संघटनेचेही नाही, या दैवताला पक्षीय, राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न कोणी केला, तरी ते भारतीयांना मान्य होणार नाही. प्रभू रामचंद्रांविषयी सर्वांच्या मनात आस्था आहे. आपल्या सहज बोलण्यातही श्रीरामाचे नाव घेतले जाते हे त्याचेच उदाहरण आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा साजरा होत असताना याच श्रद्धायुक्त भावनेने आम्ही प्रभू श्रीरामाची महाआरती करीत आहोत. श्रीरामाचा पक्षीय, राजकीय वापर करणाऱ्यांना रामरायानेच सद्बुद्धी द्यावी, अशी आमची प्रार्थना असेल. काँग्रेसचे नेते, पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते अयोध्येतील श्रीराम मंदिराचा शीलान्यास झालेला आहे, पण त्याचा कधीही राजकीय वापर करण्यात आला नाही, याचेही स्मरण यानिमित्ताने होईल.
महाआरतीत पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. सदाशिव पेठेत नागनाथ पाराजवळील रहाळकर श्रीराम मंदिर सुमारे २०० वर्ष जुने असून तिथे पट्टाभिशक्त श्रीरामाची मूर्ती आहे, अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या श्रीराम मंदिरात महाआरती होईल, असे जोशी यांनी सांगितले.