काँग्रेसमधील उद्रेक वाढला
By admin | Published: March 8, 2017 05:10 AM2017-03-08T05:10:38+5:302017-03-08T05:10:38+5:30
आमदार अनंत गाडगीळ यांनी असंतोषाला वाचा फोडल्यानंतर काँग्रेसमध्ये आता पराभूत उमेदवारांनीही पक्षाच्या नेत्यांना महापालिका निवडणुकीतील पराभवासाठी जबाबदार
पुणे : आमदार अनंत गाडगीळ यांनी असंतोषाला वाचा फोडल्यानंतर काँग्रेसमध्ये आता पराभूत उमेदवारांनीही पक्षाच्या नेत्यांना महापालिका निवडणुकीतील पराभवासाठी जबाबदार धरण्यास सुरूवात केली आहे. काँग्रेस भवन येथे सोमवारी सायंकाळी पराभूत उमेदवारांची बैठक झाली. त्यात नेत्यांवर बरेच तोंडसुख घेण्यात आले, अशी माहिती मिळाली.
पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम व माजी आमदार मोहन जोशी या बैठकीला उपस्थित होेते. आदल्या दिवशी रविवारी निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांची बैठक झाली पण ती शांततेत पार पडली. सोमवारच्या बैठकीत मात्र उपस्थितांनी प्रश्नांची सरबत्तीच पदाधिकाऱ्यांवर केली असल्याचे समजते. बहुतेक उमेदवार संतप्त झाले होते. उमेदवारी देऊन पक्षाने व नेत्यांनीही उमेदवारांना वाऱ्यावर सोडले, निवडून यायचे तुमचे तुम्ही पाहा, आमचा त्याच्याशी काही संबधच नाही, असाच नेत्यांचा आविर्भाव असल्याचा आरोप उमेदवारांनी केला.
सुरुवातीच्या आरोपांनंतर बहुसंख्य उमेदवारांनी निवडणुकीत तुम्ही आम्हाला काय मदत केली ते सांगा, एवढा एकच प्रश्न लावून धरला व त्याचे उत्तर नेत्यांना देता आले नाही. सभेसाठी राज्यातून नेते आणले नाहीत. जे आले त्यांच्या सभा आपल्या निकटच्या उमेदवारांच्या प्रभागातच होतील, याची काळजी घेतली गेली, आर्थिक मदत करणे तर बाजूलाच पण साधे प्रचारसाहित्यही पुरवण्यात आले नाही. सभेच्या १० ते १२ तास आधी सभा घेणार आहोत, असे सांगून परवानगी वगैरेची सर्व जबाबदारी उमेदवार व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांवरच सोपवण्यात येत होती.
पत्रकार परिषदेला गोलाकर खुर्च्या टाकून बसणारे आजी-माजी आमदार व पालिकेतील पदाधिकारी एकाही उमेदवाराच्या प्रचारासाठी त्यांच्या प्रभागात फिरकले देखील नाहीत, अशी टीका एका उमेदवाराने केली. गाडगीळ यांनी काँग्रेसचा पराभव करण्याचा कट काँग्रेसमधीलच काहीजणांनी केला असल्याचा गंभीर आरोप केले होता. त्याचीच री काही उमेदवारांनी ओढली व संपूर्ण निवडणूक काळातील स्थानिक नेत्यांचे वर्तन पाहिले असता गाडगीळ यांचा आरोप खरा असल्याचे सिद्ध होत आहे, असे सांगितले.
पार्लमेंटरी बैठक कधी झाली ते सांगा, प्रत्येक निवडणुकीसाठी पक्षातर्फे प्रदेशस्तरावरून एक निरीक्षक नियुक्त केला जातो. या निवडणुकीत कोण निरीक्षक होते, ते सांगा, त्यांची बैठक कधी झाली त्याची माहिती द्या, असे असंख्य प्रश्न संतप्त उमेदवारांनी उपस्थित केले. त्यांच्या एकाही प्रश्नाला उपस्थित नेत्यांना उत्तर देता आले नाही.
(प्रतिनिधी)
काँग्रेसभवनमध्ये ‘त्यांना’ ठोकून काढू
प्रभागात येऊन काही काँग्रेसजनांनीच सुप्तपणे विरोधी उमेदवाराचा प्रचार केला, त्याच्या क्लिपिंग असल्याचे काही उमेदवारांनी सांगितले. आता पुन्हा या व्यक्ती काँग्रेस भवनमध्ये दिसल्या तर त्यांना ठोकून काढू असे मोजक्याच मतांनी पराभूत झालेल्या एका उमेदवाराने बैठकीत ठणकावून सांगितले.
पुण्यात येऊन उमेदवारी वाटपात हस्तक्षेप करणारे नेते आता कुठे आहेत, त्यांना बैठकीला का बोलावले नाही, अशी विचारणा करण्यात आली. प्रचारकाळात हे नेते कुठेही दिसले नाही, अशी टीका करण्यात आली.
महापालिकेच्या इतिहासात काँग्रेसचे प्रथमच इतके पानिपत झाले आहे. त्याचा रोष इतका आहे की शहराच्या अनेक भागांमध्ये ताकद नसलेल्यांना तिकिटे देणाऱ्या नेत्यांचे अभिनंदन असे उपरोधिक फलक लावण्यात आले आहेत.
शहराध्यक्षांनी ही बैठक बोलावली होती. मला बैठकीचा निरोप दुपारी मिळाला. बैठकीत पराभूत उमेदवारांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या, बाकी विशेष काही झाले नाही. पराभूत झाल्यामुळे त्यांचे संतप्त होणे स्वाभाविक आहे. शहराध्यक्ष व मीही त्या भावना ऐकून घेतल्या. निवडणुकीच्या अहवाल या सगळ्याचा उल्लेख केला जाईल.
- विश्वजित कदम, प्रदेश अध्यक्ष, युवक काँग्रेस