उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे धनंजय पाटील विजयी
By admin | Published: February 18, 2017 02:47 AM2017-02-18T02:47:39+5:302017-02-18T02:47:39+5:30
इंदापूर नगर परिषदेच्या उपाध्यक्षपद निवडणुकीत काँग्रेसचे धनंजय पाटील यांचा विजय झाला. काँग्रेस पक्षाचे भरत शहा व राष्ट्रवादी
इंदापूर : इंदापूर नगर परिषदेच्या उपाध्यक्षपद निवडणुकीत काँग्रेसचे धनंजय पाटील यांचा विजय झाला. काँग्रेस पक्षाचे भरत शहा व राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीधर बाब्रस यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती केली.
बाब्रस यांच्या निवडीच्या निमित्ताने नगरपरिषदेच्या माजी कर्मचाऱ्यास नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.
या निवडीसाठी नगराध्यक्ष अंकिता मुकुंद शहा यांच्या अध्यक्षतेखाली पहिली सर्वसाधारण सभा बोलविली होती. त्या सभेत निवडणूक व नियुक्तीची प्रक्रिया पार पडली. उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या वतीने धनंजय पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस वतीने हेमलता माळुंजकर यांनी उमेदवारी जाहीर केली होती. हात उंचावून मतदान प्रक्रिया पार पडली. दोन्ही उमेदवारांना समान प्रत्येकी नऊ मते मिळाली. त्यानंतर १ डिसेंबर २०१६च्या शासन निर्णयानुसार नगराध्यक्षांना एक निर्णायक मत देण्याचा अधिकार असल्याने नगराध्यक्ष शहा यांनी एक जादा मत पाटील यांच्या पारड्यात टाकल्याने धनंजय पाटील यांचा विजय झाला.
स्वीकृत सदस्य निवडीच्या निमित्ताने नगरपरिषदेचे माजी कर्मचारी बाब्रस म्हणाले, की एक कर्मचारी व नागरिक म्हणून मला दोन्ही समाज घटकांच्या समस्यांची चांगल्या प्रकारे जाण आहे. समाजातील सर्वच घटकांना न्याय देण्याकरिता आपण पारदर्शी कारभाराचा आग्रह धरणार आहोत.
सुवर्णा मखरे, अनिता धोत्रे, धनंजय पाटील, जगदीश मोहिते, रजिया शेख, मीना मोमीन, कैलास कदम, मनीषा शिंदे, अनिकेत वाघ, स्वप्निल राऊत, हेमलता माळुंजकर, उषा स्वामी, अमर गाडे, पोपट शिंदे, राजश्री मखरे, गजानन गवळी, मधुरा पवार यांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला. इंदापूर नगरपरिषदेची निर्धारित सदस्य संख्या १८ आहे. त्यानुसार स्वीकृत नगरसेवकांसाठी काँग्रेस पक्षाचे गटनेते कैलास कदम यांनी भरत शहा यांचे तर राष्ट्रवादीचे गटनेते गजानन गवळी यांनी श्रीधर बाब्रस यांच्या नावांचे प्रस्ताव दिले होते. प्रांताधिकारी तथा पीठासीन अधिकारी हेमंत निकम यांची त्यांच्या अर्जांची छाननी केली. दोन्ही अर्ज वैध ठरले. सर्वांना बरोबर घेऊन शहराच्या विकासाचे काम करण्याचे पाणी, वीज व रस्ते या प्रमुख गरजा पूर्ण करण्याकडे आपण लक्ष देणार असल्याची ग्वाही धनंजय पाटील यांनी दिली. तर पारदर्शी कारभार करताना शहराच्या सुनियोजित विकास करण्याचा प्रयत्न राहील. त्यासाठी पक्षीय राजकारण कटाक्षाने बाजूला ठेवले जाईल, अशी प्रतिक्रिया भरत शहा यांनी व्यक्त केली.(वार्ताहर)