उद्योजकांचे बळ पालिकेशी कनेक्ट
By admin | Published: November 10, 2015 01:55 AM2015-11-10T01:55:03+5:302015-11-10T01:55:03+5:30
स्मार्ट सिटीच्या दिशेने प्रवास करणाऱ्या पुणे महापालिकेशी उद्योजकांचे व्यासपीठही कनेक्ट होणार आहे. उद्योगांच्या सहकार्यातून अनेक विकासाची कामे मार्गी लावण्यास महापालिकेला बळ मिळणार आहे.
पुणे : स्मार्ट सिटीच्या दिशेने प्रवास करणाऱ्या पुणे महापालिकेशी उद्योजकांचे व्यासपीठही कनेक्ट होणार आहे. उद्योगांच्या सहकार्यातून अनेक विकासाची कामे मार्गी लावण्यास महापालिकेला बळ मिळणार आहे. शहरातील विविध उद्योगांनी एकत्र येऊन स्थापन केलेली ‘पुणे सिटी कनेक्ट’ ही कंपनी व पुणे महापालिका यांच्यात शहरातील विविध कामांच्या संदर्भात सहकार्य व सहयोग यासाठी सोवारी सामंजस्य करार झाला. गुणवत्तापुर्ण शिक्षण, डिजीटल एज्युकेशन, स्वच्छता, पर्यटन आदी विषयांवर प्रामुख्याने काम करण्यात येणार आहे.
‘पुणे सिटी कनेक्ट’ चे चेअरमन गणेश नटराजन आणि महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी यावेळी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. महापौर दत्तात्रय धनकवडे, स्थायी समितीच्या अध्यक्ष अश्विनी कदम, ‘पुणे कनेक्ट कंपनी’च्या सीईओ रूचा माथूर व्यासपीठावर उपस्थित होते. पुण्यातील उद्योगांच्या या सहकार्यातून विकासाची अनेक कामे होतील, उद्योजकांचा हा प्रयत्न पुणे शहराला भविष्यात एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल अशी भावना यावेळी सर्व वक्त्यांनी प्रकट केली.
कुणाल कुमार यांनी उद्योगांचे हे व्यासपीठ पुणे महापालिकेला मिळाल्यामुळे एक मोठी शक्ती मिळाली असल्याचे सांगितले.
महापौर दत्तात्रय धनकवडे यांनीही उद्योगांनी दाखवलेल्या या विकासात्मक दृष्टिकोनासाठी त्यांचे आभार मानले. ‘पुणे कनेक्ट’ मध्ये आणखी कंपन्या सहभागी होतील व महापालिकेच्या सहकार्याने नागरिकांच्या स्वप्नातील पुणे प्रत्यक्षात येईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
महापालिकेतील विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, सभागृह नेते बंडू केमसे, मनसेचे गटनेते राजेंद्र वागस्कर, शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ, महेंद्र पठारे आदी यावेळी उपस्थित होते. अनू आगा,आनंद देशपांडे, अंशू गौर, अरूण नाथानी, अश्विनी मल्होत्रा, शीतल बापट, अतूल चोरडिया, कुमार गेरा, रजनिश मालवीय, समीर गाडगीळ, रामप्रसाद, अजय मेहता, रमेश मिराखूर, अश्विन भांडारकर, अनंत सरदेशमूख, आदेश गोखले, उमा गणेश, वैभवी पाठक, मनोज साकटे, पल्लवी देशपांडे आदी उद्योजक यावेळी उपस्थित होते. रूचा माथूर यांनी सुत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)