आध्यात्मिक संस्काराने जोडावे
By admin | Published: March 3, 2016 01:23 AM2016-03-03T01:23:53+5:302016-03-03T01:23:53+5:30
श्रीक्षेत्र नारायणपूरचे नारायणमहाराज माणसातील माणूस जागा करणारे व देशबांधवांना आध्यात्मिक संस्काराने जोडणारे होते.
पिंपरी : श्रीक्षेत्र नारायणपूरचे नारायणमहाराज माणसातील माणूस जागा करणारे व देशबांधवांना आध्यात्मिक संस्काराने जोडणारे होते. अण्णा महाराजांनी एकत्र कुटुंब पद्धतीचा आदर्श जपत थोरा-मोठ्यांचा सन्मान राखण्याची शिकवण दिली, असे प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले.
आमदार लक्ष्मण जगताप व श्री दत्त सेवेकरी मंडळ, नारायणपूर यांच्या वतीने पिंपळे गुरव येथील नर्मदा उद्यानात चारदिवसीय नारायण ज्ञानबोध ग्रंथवाचन सामुदायिक पारायण सोहळ्याची मंगळवारी सांगता झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी महापौर शकुंतला धराडे, माजी आमदार उल्हास पवार, विलास लांडे, रामलिंग स्वामीमहाराज, नगरसेवक संजय वाबळे, राजेंद्र जगताप, सुमन पवळे, माऊली लांडे आदी उपस्थित होते.
पुरंदरे म्हणाले, ‘‘नारायणमहाराज यांनी पाच दशकाहून अधिक काळ दत्तमहाराजांची उपासना व अखंड मानवजातीची सेवा केली. गावोगावी मूर्ती प्रतिष्ठापना, कलशारोहण करताना ग्रामस्वच्छता व निकोप समाजनिर्मिती केली. तंटामुक्त गाव एकसंध ठेवण्याचा मंत्र त्यांनी प्रवचनातून दिला. त्यांनी शिबिराद्वारे बिगरहुंडा मोफत सामुदायिक विवाह सोहळा चळवळ यशस्वी करून दारिद्र्य कर्ज यातून जागृती केली. युवकांना व्यायामशाळेची पायवाट दाखविणाऱ्या सद्गुरू अण्णा महाराजांनी एकत्र कुटुंबपद्धतीचा आदर्श जपत थोरा-मोठ्यांचा सन्मान राखण्याची शिकवण दिली.’’
दररोज सुमारे दोन हजार नागरिकांनी पारायण केले. शेवटच्या दिवशी सकाळी आठ ते दहापर्यंत ग्रंथवाचन व निरुपण, सकाळी १० ते ११ या वेळेत संकुलपूजन, सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत ग्रंथदिंडी, ग्रामप्रदक्षिणा मिरवणूक काढण्यात आली. विलास लांडे, माजी नगरसेवक शंकर जगताप सहभागी झाले. दुपारी बारा ते दोन या वेळेत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. (प्रतिनिधी)