छावा चित्रपटात जाणिवपूर्वक बदनामीचा कट; राजे शिर्के घराण्यातील वंशजांचा आरोप

By श्रीकिशन काळे | Updated: February 21, 2025 18:10 IST2025-02-21T18:09:37+5:302025-02-21T18:10:15+5:30

खरंतर चित्रपटात आमच्या घराण्याची जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे.

Conscious defamation conspiracy in the film Chhava; Allegation by descendants of Raje Shirke family | छावा चित्रपटात जाणिवपूर्वक बदनामीचा कट; राजे शिर्के घराण्यातील वंशजांचा आरोप

छावा चित्रपटात जाणिवपूर्वक बदनामीचा कट; राजे शिर्के घराण्यातील वंशजांचा आरोप

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ सिनेमा देशात गाजत असला तरी त्यातील काही गोष्टींवरून वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटात शंभूपत्नी महाराणी येसूबाई साहेब यांचे थोरले बंधू श्रीमंत गणोजीराजे शिर्के यांना फितूर दाखवले आहे. याचा कोणताही ऐतिहासिक पुरावा नसताना शिर्के घराण्याची बदनामी केली जात आहे, असा आरोप शिर्के घराण्यातील वंशजांनी केला आहे. सिनेमाचे दिग्दर्शक व लेखक दोघांचाही निषेध करण्यात आला आहे.

गडदुर्ग संवर्धन ट्रस्ट महाराष्ट्र राज्य आणि शिर्के कुटुंबीयांचे वंशज अमित राजे शिर्के, किशोर राजे शिर्के आदींनी शुक्रवारी (दि.२१) पुण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी याविषयाची माहिती दिली. त्यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि छावा कादंबरीच्या प्रकाशकांना संबंधित घटनांचे पुरावे, संदर्भ दाखवावे, यासाठी नोटीस बजावली आहे. खरं तर चित्रपटामध्ये ते दाखवण्यापूर्वी आमच्या घराण्याशी चर्चा करणे अपेक्षित होते, पण तसे काहीही झाले नाही. त्यामुळे दिग्दर्शक उतेकर यांनी ते बदनामीकारक प्रसंग चित्रपटातून काढून टाकावेत, अन्यथा राज्यभर आंदोलन करू, असा इशारा दीपक शिर्के यांनी दिला आहे.

खरं तर चित्रपटात आमच्या घराण्याची जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे. स्वराज्य निर्माणासाठी राजे शिर्के घराण्याचे खूप मोठे योगदान आहे. आम्ही कधीच गद्दारी केली नाही, तसे कुठलेही पुरावे उपलब्ध नाहीत. आम्ही चित्रपटाच्या विरोधात नाही, पण आम्हाला खलनायक केले जात आहे. त्यामुळे समाजात आमच्याविषयी द्वेष निर्माण होत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांना पकडण्यासाठी त्यांचा ठावठिकाणा गणोजी शिर्के यांनी सांगितलेला नाही, असा दावाही ज्यांनी केला आहे.

चित्रपटात राजे शिर्के घराण्याविषयी चुकीचा इतिहास दाखविला जात आहे. त्यामुळे सर्व वंशज, नातेवाईक, मराठा समाज, इतिहास अभ्यासक, गडदुर्गप्रेमी दुखावले गेले आहेत. त्यामुळे चित्रपटातील चुकीचा संदर्भ काढून टाकावा अशी आमची मागणी आहे, असे दीपक शिर्के यांनी सांगितले.

 

Web Title: Conscious defamation conspiracy in the film Chhava; Allegation by descendants of Raje Shirke family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.