जागरूक पालक, सुदृढ बालक; राज्यात २ काेटी १२ लाख बालकांची आराेग्य तपासणी
By ज्ञानेश्वर भोंडे | Published: May 21, 2023 04:26 PM2023-05-21T16:26:38+5:302023-05-21T16:27:41+5:30
काही बालकांना ह्रदयराेग, दंतविकार, रक्तशय, कुपाेषण आदी आजार आढळून आले
पुणे: ‘जागरूक पालक, सुदृढ बालक’ या माेहिमेद्वारे संपूर्ण राज्यात शुन्य ते १८ वयाेगटातील २ काेटी १२ लाख बालकांची आराेग्य तपासणी करण्यात आली. त्यापैकी पुण्यातील १८ लाख १ हजार बालकांचा समावेश आहे. तपासणी करण्यात आलेल्या बालकांपैकी काही बालकांना ह्रदयराेग, दंतविकार, रक्तशय, कुपाेषण आदी आजार आढळून आले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून काहींना उपचारासाठी संदर्भित करण्यात आले आहे.
या अभियानांतर्गत 0 ते 18 वर्षापर्यंतच्या बालकांची/ किशोरवयीन मुला-मुलींची प्राथमिक आरोग्य तपासणी करणे, आजारी आढळलेल्या बालकांवर त्वरित उपचार करणे, गरजू आजारी बालकांना संदर्भ सेवा देऊन उपचार करणे (उदा. औषधोपचार, शस्त्रक्रिया, इ.), प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा पुरविणे तसेच सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन करण्यात आले. यासाठी अंदाजित 12 हजारांपेक्षा अधिक पथके कार्यरत आहेत.
येथे झाली तपासणी
शासकीय व निमशासकीय शाळा व कनिष्ठ महाविद्यालये, आश्रमशाळा, अंध- दिव्यांग, अंगणवाड्या, बालगृहे/ बालसुधारगृहे, अनाथालये, समाजकल्याण व आदिवासी विभाग वसतिगृहे मुले/मुली, खाजगी नर्सरी, बालवाडया, खाजगी शाळा व खाजगी कनिष्ठ महाविद्यालये.
हे तपासले आजार
नवजात बालकांमधील जन्मजात व्यंग , रक्तक्षय, डोळ्यांचे आजार, गलगंड, स्वच्छ मुख अभियान, दंतविकार, हृदयरोग, क्षयरोग, कुष्ठरोग, कॅन्सर, अस्थमा, एपिलेप्सी इ. आजारांच्या संशयित रुग्णांना ओळखून त्वरित संदर्भित करणे आदी.
राज्यात दाेन काेटी बालकांची तपासणी
राज्यात आतापर्यन्त एकूण 95 लाख 475 शाळा व 95 लाख 582 अंगणवाडी मध्ये आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. त्यामधील 2 काेटी 12 लाख बालकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 63 लाख 33 हजार बालके 0 ते 6 वर्षे, 63 लाख 18 हजार 6 ते 10 वर्षे व 85 लाख 71 हजार 10 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांचा समावेश आहे. यामध्ये 9 लाख 50 हजार 363 इतकी आजारी बालके आढळली असून त्यापैकी 6 लाख 78 हजार इतक्या बालकांवर त्वरित उपचार करण्यात आले आहेत. तसेच 3 लाख 4 हजार 183 बालके उच्चस्तरीय उपचाराकरिता संदर्भित करण्यात आली आहेत.