सलग सुट्या नावाला; पोलीस कामासाठी जुंपलेले
By admin | Published: October 6, 2014 06:35 AM2014-10-06T06:35:55+5:302014-10-06T06:35:55+5:30
चार दिवस सलग आलेली सुटी..., चला जाऊ फिरायला...., गावाकडे जाऊन सण साजरा करू..., असे नियोजन सर्वसामान्यांनी केले;
मंगेश पांडे, पिंपरी
चार दिवस सलग आलेली सुटी..., चला जाऊ फिरायला...., गावाकडे जाऊन सण साजरा करू..., असे नियोजन सर्वसामान्यांनी केले; पण या नियोजनाला अपवाद ठरले ते पोलीस. कारण त्यांच्या साप्ताहिक सुट्या निवडणुकीमुळे रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रजा मागण्याचा प्रश्नच येत नाही. पुढील १५ दिवस त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण वाढणार आहे. अशातच गंभीर गुन्हेदेखील घडत असून, या गुन्ह्यांची नोंद करून पुढील तपासाची जबाबदारीही पार पाडली जात आहे. अशा व्यस्त कामकाजामुळे पुरेशी झोप नाही की, वेळेवर जेवण नाही अशी पोलिसांची अवस्था आहे.
सण-समारंभ आणि साप्ताहिक सुटी म्हटले की, कुटुंबीयांसमवेत सण साजरा करत कुटुंबीयांना वेळ द्यायचा, असे प्रत्येकाचेच नियोजन असते. मात्र, १२ सप्टेंबरला निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून पोलिसांच्या सुट्या, रजा रद्द आहेत. चोवीस तास ‘अॅलर्ट’ राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आचारसंहिता काळात कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांची जबाबदारीदेखील अधिकच वाढली आहे. योग्य नियोजन करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू झाल्या. प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करण्यात आली. पिंपरी-चिंचवड शहरात झोपडपट्टीचा भाग मोठ्या प्रमाणावर आहे. यापूर्वी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेल्या भागांवर पोलिसांनी अधिक लक्ष केंद्रित केले आहे. या भागांसह विविध भागात विशेष मोहीम राबवीत सराईत गुन्हेगारांवर कारवाई सुरू आहे. त्यासाठी विशेष पथकाची नेमणूक झाली आहे. ठिकठिकाणी पथसंचलन करण्यात येत आहे.
कायदा आणि सुव्यवस्था कायम राखून भयमुक्त वातावरणात निवडणूक पार पडावी, यासाठी पोलीस प्रशासनाकडून पुरेपूर काळजी घेतली जात आहे. अपुरे मनुष्यबळ, गुन्ह्याचा वाढता आलेख यामुळे ताण वाढला असतानाच निवडणुकीची अतिमहत्त्वाची जबाबदारी पेलण्याचे आव्हानही आहे.
निवडणुकीत राजकीय कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ कारणावरून वाद, त्यावरून मारामारी होते आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. म्हणून उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांवर पोलीस बारकाईने लक्ष ठेवून आहेत. सभा, पदयात्रा यांचे चित्रीकरण केले जात आहे. पोलिसांवर कामाची अतिरिक्त जबाबदारीही सोपविण्यात आली असून, त्यामुळे पोलिसांची पळापळ होत आहे. बारा तासांची ड्युटी, त्यातच रद्द झालेल्या सुट्या यामुळे होणारा तणाव पोलिसांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. निवडणूक कामाच्या जबाबदारीमुळे पोलीस व्यस्त होते. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना घरगुती कार्यक्रमांनाही उपस्थित राहता येत नाही.
अमुकतमुक ठिकाणी गोंधळाचे वातावरण आहे, अशी माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी धाव घेत आहेत. कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी घटनास्थळी दाखल होऊन प्रकरणाची पूर्ण शहानिशा केली जात आहे.