'कन्सेन्ट अॅप'... परस्परसंमतीने शरीरसंबंध ठेवल्याचा ठेवा पुरावा; सोशल मीडियात चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 03:07 PM2018-10-23T15:07:30+5:302018-10-23T15:11:53+5:30

बलात्काराचे खोटे आरोप होऊ नयेत, यासाठी कन्सेंट अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून दोघांनीही परस्पर संमतीने शरीरसंबंध ठेवल्याचे सिध्द करता येणार असल्याची चर्चा आहे.

'Consent App' ... keep the proof of consent in sexual relationship | 'कन्सेन्ट अॅप'... परस्परसंमतीने शरीरसंबंध ठेवल्याचा ठेवा पुरावा; सोशल मीडियात चर्चेला उधाण

'कन्सेन्ट अॅप'... परस्परसंमतीने शरीरसंबंध ठेवल्याचा ठेवा पुरावा; सोशल मीडियात चर्चेला उधाण

Next

प्रज्ञा केळकर-सिंग  
पुणे : ‘हॅशटॅग मी टू’ चळवळीने सोशल मिडिया ढवळून निघालेला असताना आता ‘कन्सेंट अ‍ॅप’च्या चर्चेने जोर धरला आहे. ‘मी टू’ चळवळीचा काही अंशी गैरफायदा घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे; दुसरीकडे, बलात्काराचे खोटे आरोप होऊ नयेत, यासाठी कन्सेंट अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून दोघांनीही परस्पर संमतीने शरीरसंबंध ठेवल्याचे सिध्द करता येणार असल्याची चर्चा आहे. अमेरिकन डेव्हलपर्सनी हे अ‍ॅप्लिकेशन तयार केले असून भारतामध्ये हे ‘कन्सेंट’ ग्राह्य धरले जाणार का, याविषयी नेटिझन्सकडून विविध मते नोंदवली जात आहेत. कन्सेंट ही संकल्पना समजून घेण्याइतका आपला समाज परिपक्व झाला आहे का, असा प्रश्न जाणकारांकडून उपस्थित करण्यात येत आहे.  


                सध्याचा जमाना तंत्रज्ञानाचा आणि सोशल मिडियाचा आहे. तरुणाईकडून स्मार्टफोनवर विविध अ‍ॅप्लिकेशन्स डाऊनलोड केली जातात. आतापर्यंत कामातील उपयुक्तता अथवा मनोरंजापुरताच अ‍ॅप्लिकेशन्सचा वापर केला जायचा. मात्र, आता ही अ‍ॅप्लिकेशन्स मानवी नातेसंबंधांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहेत. त्यातूनच कन्सेंट अ‍ॅपबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. 

नेमके काय आहे कन्सेंट अ‍ॅप?
स्मार्टफोनवर अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर ‘कन्सेंट फॉर्म’ उघडला जातो. यामध्ये ‘मी कायद्यानुसार सज्ञान असून स्वत:च्या मर्जीने शरीरसंबंध ठेवण्यास तयार आहे. शरीरसंबंधांबाबत अस्तित्वात असलेल्या सर्व कायद्यांची मला जाण आहे’, असा मेसेज विंडोमध्ये ओपन होतो. आपले नाव, ईमेल आयडी टाकल्यानंतर आणि सहमती दर्शवल्यानंतर आपल्या जोडीदाराचे नाव त्यामध्ये फीड करायचे असते. त्यानंतर दोघांना सेल्फी काढून अपलोड केल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होते.   

कन्सेंट अ‍ॅपनुसार, दोन्ही जोडीदारांनी आपल्या संमती दर्शवल्याने भविष्यात कोणत्याही कारणाने मतभेद झाल्यास एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करता येणार नाहीत आणि हे अ‍ॅप्लिकेशन पुरावा म्हणून वापरता येऊ शकेल, असे मत तरुणाईकडून व्यक्त केले जात आहे. मी कोणाच्याही दबावाखाली येऊन सहमती दिलेली नाही, हा करार केवळ दोघांपुरता मर्यादित असून तिस-या कोणालाही दाखवून फसवणूक करता येणार नाही. या करारानुसार, माझ्यावर शरीसबंधांसाठी जबरदस्ती करण्यात आलेली नाही, अशा प्रकारच्या अटी आणि नियमांचा अ‍ॅपमध्ये समावेश आहे. मात्र, भारतीय संस्कृतीमध्ये नातेसंबंध विश्वासाच्या आधारावर टिकत असताना अशा प्रकारच्या अ‍ॅप्लिकेशनमुळे नातेसंबंधातील विश्वासाला तडा जाण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.    

 तज्ज्ञ काय म्हणतात ?

समोरच्या व्यक्तीवर दबाव निर्माण करुन कन्सेंट साईन करुन घेता येऊ शकते. बहुतांश वेळा शारीरिक संबंध वैयक्तिक कारणामुळे अथवा भावनेच्या भरात येऊन ठेवले जातात.  
त्यावेळी कन्सेंट अ‍ॅपचा वापर करताच येणार नाही. मुळात अ‍ॅपला कायदेशीर मान्यता आहे का, हा महत्वाचा प्रश्न आहे. नात्याची सुरुवातच अविश्वासाने होणार असेल तर अशी नाती फार काळ टिकूही शकणार नाहीत. कन्सेंट अ‍ॅप्लिकेशन नोंदणीकृत आहेत का, याचाही विचार व्हायला हवा. नातेसंबध विवाहबाह्य असतील किंवा काही काळापुरतेच असतील तर ते गोपनीय ठेवण्यावर दोघांचाही भर असतो. नातेच उघडकीस आणायचे नसेल तर कन्सेंटच्या माध्यमातून स्वत:ची ओळख खुली केली जाणारच नाही. याबाबत कमालीची जनजागृती होण्याची गरज आहे. अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून लैंगिक अत्याचाराला आळा घालता येणार नाही.   
- डॉ. हिमानी कुलकर्णी, मानसोपचारतज्ज्ञ  

पूर्वी बलात्काराच्या तक्रारी सर्रास दाखल होत असत. आरोपीला अटक केल्यानंतर खटला चालवला जात असे. खटल्यामध्ये खरे-खोटे सिध्द होत असे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, दोन सज्ञान व्यक्ती शरीरसंबंध ठेवत असतील तर त्यामध्ये बलात्काराचा आरोप करता येणार नाही. पुरावा कायद्यातील ६५ (ड) कायद्यामध्ये नमूद केलेल्या नियमावलीमध्ये एखादा पुरावा बसत असेल तरच तो ग्राह्य धरला जातो.   
- अ‍ॅड. सुप्रिया कोठारी, कायदेतज्ज्ञ

Web Title: 'Consent App' ... keep the proof of consent in sexual relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.