व्यसनाधिनतेमुळे विकासावर परिणाम
By admin | Published: October 13, 2014 06:06 AM2014-10-13T06:06:30+5:302014-10-13T06:06:30+5:30
आरोग्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांनी व्यसनाधिनता कमी करण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करायला हवेत, असे मत माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्त केले.
पुणे : ‘‘शालेय मुलांमध्ये व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत चालले असून, समाजामध्ये याबाबत जनजागृती करणे गरजेचे असून, शेतकरी, विविध कारखान्यांमध्ये काम करणारे कामगार यांच्यातील वाढत्या व्यसनाधिनतेमुळे देशाच्या आर्थिक विकासावर परिणाम होत आहे.
त्यामुळे आरोग्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांनी व्यसनाधिनता कमी करण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करायला हवेत, असे मत माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्त केले.
द्वारिका संगमनेरकर मेडिकल फाउंडेशनतर्फे आयोजित शतायुषी पुरस्कार वितरण समारंभप्रसंगी प्रतिभाताई पाटील बोलत होत्या. पाटील यांच्या हस्ते संतोष पवार, पद्मजा गोडबोले आणि अभय मुथा यांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले. तर ‘शाळकरी मुलामुलींचे आजार-आरोग्य आणि अभ्यास’ या विषयावरील शतायुषी आरोग्य विशेषांकाचे प्रकाशन बालरोगतज्ज्ञ डॉ. उल्हास कोल्हटकर यांच्या हस्ते झाले. या वेळी शतायुषीचे डॉ. अरविंद संगमनेरकर, एन.सी. जोशी उपस्थित होते.कार्यक्रमात ‘शाळकरी मुलामुलींचे आजार- आरोग्य आणि अभ्यास’ या विषयावर कोल्हटकर यांनी मार्गदर्शन केले. संगमनेर येथे एड्सग्रस्त मुलामुलींसाठी काम करणाऱ्या संतोष पवार यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच शतायुषीतर्फे घेण्यात आलेल्या लेख स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. (प्रतिनिधी)