२८ किल्ल्यांचे संवर्धन अन् ९० कोटींची विकासकामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:08 AM2021-06-19T04:08:08+5:302021-06-19T04:08:08+5:30
(भाग -४) पुणे : राज्याच्या दुर्गसंवर्धन समितीने पाच वर्षांच्या कालावधीत चांगले काम केले आहे. २८ किल्ल्यांवर संवर्धनाचे ९० टक्के ...
(भाग -४)
पुणे : राज्याच्या दुर्गसंवर्धन समितीने पाच वर्षांच्या कालावधीत चांगले काम केले आहे. २८ किल्ल्यांवर संवर्धनाचे ९० टक्के काम झाले. तसेच राज्यातील ८३ गड, किल्ले राज्य संरक्षित स्मारक करावे, यासाठी शासनाबरोबर समितीने पाठपुरावा केला आहे. मात्र, तरीही समिती का बरखास्त केली, असा सवाल दुर्गसंवर्धन समितीतील डॉ. सचिन जोशी, राजेंद्र टिपरे आणि इतर सदस्यांनी केला आहे.
राज्य शासनाने सुरुवातीला १४ किल्ल्यांच्या संवर्धनासाठी १२० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यामुळे कोणत्या किल्ल्यांवर तो खर्च करायचा याची यादी समितीने केली. समितीच्या डिसेंबर २०१९ पर्यंतच्या कालावधीत विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण येथील एकूण २८ किल्ल्यांवर संवर्धनाची कामे सुरू झाली. पुरातत्व विभागाने यातील अंदाजे ९० कोटी रुपयांचा निधी खर्च करून माणिकगड, माहूरगड (विदर्भ), कोरीगड (पुणे), विशाळगड (कोल्हापूर), बाणकोट, पूर्णगड (रत्नागिरी) या किल्ल्यांवर संवर्धनाचे काम झाले आहे. ही सर्व कामे दुर्ग संवर्धन समितीच्या २०१५ ते २०१९ या कालावधीत झाली, असे डेक्कन कॉलेज पुरातत्त्व विभागाचे संशोधक डॉ. सचिन जोशी यांनी सांगितले.
------------
समितीचे काम चांगले सुरु होते. २८ किल्ल्यांवरील ९० टक्के पूर्ण झाले आहे. समितीचे काम थांबवणे चुकीचे होते. त्यामुळे दोन वर्षे झाली गड, किल्ले संवर्धनाच्या कामात खंड पडला आहे. आता नव्याने २५० लोकांबरोबर शासन काम करणार आहे. मात्र, यातील बहुतेक लोक हे इतर क्षेत्राशी संबंधित आहेत. त्यामुळे गड, किल्ल्यांशी निगडित काम कसे होणार असा प्रश्न पडतो. ऐतिहासिक वास्तू, स्मारकाबाबत गांभीर्याने विचार, काम होणे अपेक्षित आहे.
- राजेंद्र टिपरे, सदस्य, दुर्गसंवर्धन समिती
------------
बाणकोट किल्ल्याची अवस्था खूपच वाईट होती. तट बुरूजांवर झाडे वाढली होती. पडझड झाली होती. स्थानिक नागरिकांच्या मदतीने किल्ला स्वच्छ केला होता. गडावर ध्वजासाठी पोलही लावला. उपसंचालक भा. वि. कुलकर्णी यांना कोकणातील हा किल्ला संवर्धनासाठी घेण्यासाठी सुचवले.
- चंद्रशेखर शेळके, सदस्य, दुर्ग संवर्धन समिती
-------------
समितीने केलेली कामे
गड, किल्ल्यांचे डॉक्युमेंटेशन, मॅपिंग करण्यासाठी सातत्याने दोन वर्षे पाठपुरावा केला. गडसंवर्धनासाठी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर येथे कार्यशाळा घेतल्या. गड, किल्ल्यांच्या नकाशांचे काम सुरू केले. गडसंवर्धन हे शास्त्रशुद्ध पद्धतीने व्हावे यासाठी कायमच पुरातत्त्व विभागाकडे आग्रह धरला. दुर्गसंवर्धन करणाऱ्या विविध खासगी संस्थानी कशा प्रकारे काम करावे याचे मार्गदर्शन केले. तसेच गड, किल्ले स्वच्छता अभियान पूर्ण एक महिना विविध किल्ल्यांवर राबविले.
------------------------
फोटो : पुणे जिल्ह्यातील कोरीगड किल्ल्यावर संवर्धनाचे ९० टक्के काम झाले आहे.