निर्माल्य जिरवून होणार निसर्गाचे संवर्धन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:14 AM2021-09-14T04:14:58+5:302021-09-14T04:14:58+5:30
पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्र्वभूमीवर ‘निर्माल्य टू निसर्ग’ या उपक्रमांतर्गत कचरावेचकांनी घरोघरी जाऊन नागरिकांकडून निर्माल्य वेगळे गोळा करण्यास सुरुवात ...
पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्र्वभूमीवर ‘निर्माल्य टू निसर्ग’ या उपक्रमांतर्गत कचरावेचकांनी घरोघरी जाऊन नागरिकांकडून निर्माल्य वेगळे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. हे कचऱ्यापासून वेगळे संकलित केलेले निर्माल्य महापालिका नैसर्गिकरित्या जिरवणार आहे. महापालिका, स्वच्छ पुणे आणि कमिन्स इंडिया यांच्यातर्फे एकत्रितपणे हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
गणेशोत्सवात भाविकांनी वाहिलेले फुले, हार, दुर्वा यांसारख्या नैसर्गिकरित्या जिरवल्या जाऊ शकणाऱ्या निर्माल्याचे योग्य पद्धतीने विघटन व्हावे व कुणाच्याही श्रद्धेला तडा जाऊ न देता पर्यावरणाचे संवर्धन व्हावे या हेतूने शहरात मागील ११ वर्षांपासून गणेशोत्सवात निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबवत आहे. यामध्ये स्वच्छ संस्थेचे कचरावेचक नागरिकांकडून निर्माल्य गोळा करतात आणि हे निर्माल्य मनपाच्या गाड्यांकडे पुढील प्रक्रियेसाठी दिले जाते. कमिन्स इंडियाच्या माध्यमातून निर्माल्य गोळा करण्यासाठी लागणारी पोती कचरावेचकांना उपलब्ध करून दिली जातात. या उपक्रमाविषयी माहिती देताना स्वच्छ संस्थेचे आॅपरेशन्स हेड आलोक गोगटे म्हणाले, गणेशोत्सवादरम्यान पूजेसाठी वाहिलेले निर्माल्य कचऱ्यापासून वेगळे ठेवण्याची संस्कृती अबाधित ठेवत वेगळे गोळा केलेले निर्माल्य कचरावेचक आणि महापालिका नैसर्गिकपणे जिरवत आहे. गेल्या तीन वर्षांत महापालिकेसोबत काम करून २८६ टन निर्माल्य यशस्वीपणे गोळा करून ते इतर प्रकारच्या कचरा व्यवस्थापन प्रणालीत जाण्यापासून कचरावेचकांनी रोखले आहे. पूर्वी कचरावेचक नदीकाठी थांबून निर्माल्य गोळा करीत असत. कोविडच्या प्रादुर्भावानंतरही न थांबता घरोघरी जाऊन हा उपक्रम राबविण्यात कचरावेचकांना यश मिळाले आहे. १५ व १६ सप्टेंबर रोजी निर्माल्य कचरावेचकांना द्यावे, असे आवाहन आम्ही करतो.
------------------------------------------------------------------------------------------------