माती संवर्धन करा, अन्यथा जग दुष्काळग्रस्त! सद्गुरू यांचा इशारा; ‘लोकमत’च्या व्यासपीठावर 'सेव्ह सॉईल’चा जागर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 08:16 AM2022-06-20T08:16:26+5:302022-06-20T08:17:12+5:30

Sadguru: पर्यावरणाबाबत आताच काही केले नाही तर वेळ निघून गेलेली असेल. २५ ते ४० वर्षांत जग दुष्काळग्रस्त होईल. त्यामुळे माती संवर्धनाची चळवळ केवळ स्वसमाधानासाठी नाही तर उपाय शोधण्यासाठी आहे, असे ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरू यांनी सांगितले. 

Conserve soil, otherwise the world will suffer from drought! Sadguru's warning; Awakening of 'Save Soil' on the platform of 'Lokmat' | माती संवर्धन करा, अन्यथा जग दुष्काळग्रस्त! सद्गुरू यांचा इशारा; ‘लोकमत’च्या व्यासपीठावर 'सेव्ह सॉईल’चा जागर

माती संवर्धन करा, अन्यथा जग दुष्काळग्रस्त! सद्गुरू यांचा इशारा; ‘लोकमत’च्या व्यासपीठावर 'सेव्ह सॉईल’चा जागर

googlenewsNext

पुणे : पर्यावरणाबाबत आताच काही केले नाही तर वेळ निघून गेलेली असेल. २५ ते ४० वर्षांत जग दुष्काळग्रस्त होईल. त्यामुळे माती संवर्धनाची चळवळ केवळ स्वसमाधानासाठी नाही तर उपाय शोधण्यासाठी आहे, असे ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरू यांनी सांगितले. 

माती संवर्धनाचा जागर करण्यासाठी २६ देशांत यात्रा करून आलेल्या सद्गुरू यांनी ‘लाेकमत’च्या व्यासपीठावर पुणेकरांशी संवाद साधला. लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा, व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा आणि कर्ली टेल्सच्या काम्या जानी यांनी सद्गुरू यांच्याशी संवाद साधला. सद्गुरू म्हणाले, मानवाचे पृथ्वीवर अस्तित्व नसताना एक इंच जिवंत माती तयार करण्यासाठी ६०० ते ८०० वर्षे लागत होती. मात्र, सध्याच्या परिस्थितीत एक इंच माती तयार करण्यासाठी १३ हजार वर्षे लागतील. गेल्या शतकात आपण जमिनीचा वरचा थर नष्ट केला आहे. मात्र, मातीबाबत कुणीही बोलत नाही. अनेक आंतरराष्ट्रीय परिसंवादांतून केवळ कार्बन डायऑक्साईडबाबत बोलले जाते. जागतिक तापमानवाढीबाबत बोलतो. पण माती संवर्धनाबाबत कोणी बोलत नाही.  आपण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे माती नष्ट होण्यास जबाबदार आहोत.

 पर्यावरणीय समस्या व नागरी प्रश्न वेगळे 
एकदा माझे कार्यकर्ते एका मोठ्या उद्योजकाला भेटले. ते म्हणाले, मी आंघोळीसाठी केवळ अर्धी बादली पाणी वापरतो. मला हे करण्याची गरज नाही. अर्धी बादली पाणी वापरतोय म्हणजे  पर्यावरणासाठी काहीतरी करतोय असे म्हणायचे ही सध्याच्या शहरी नागरिकांची मानसिकता आहे. त्यांना नागरी समस्या व पर्यावरणीय समस्या यातील फरक कळत नाही. पुणे शहरातील रस्त्यांवरील प्लास्टिक बॅग ही पर्यावरण समस्या नसून सामाजिक प्रश्न आहे. पर्यावरणीय समस्याही वेगळी आहे. 

 सूक्ष्मजीव पृथ्वीवरील जीवनाचा गाभा 
मला अनेक तरुण काही ॲप दाखवून त्यातून ही समस्या सुटेल असे सांगतात. हे फूड ॲपसारखे आहे. नव्या पिढीला वाटेल की ॲपच अन्न तयार करतात. मात्र, ॲप फूड डिलिव्हरी करते. अन्न कुणीतरी पिकवते, त्यावर प्रक्रिया कोठेतरी दुसरीकहे होते.  ते मातीत पिकवले जाते हे महत्त्वाचे आहे. मात्र, सध्या 
हेच विसरले जात आहे. मातीतील सेंद्रिय पदार्थ हे सूक्ष्मजीवांचे अन्न आहे. हे सूक्ष्मजीव पृथ्वीवरील जीवनाचा गाभा आहे. मानवाशिवाय हे जीवन फुलेल मात्र, या सूक्ष्म जीवांशिवाय जीवनच नष्ट होईल.

 मातीतील सेंद्रिय पदार्थ वाढणे गरजेचे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये मातीची आरोग्य पत्रिका (सॉईल हेल्थ कार्ड) सुरू केली, परंतु लोकांनी त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही. ही पत्रिका केवळ शेतजमिनीबाबत सांगते. पण माती हे एक जीवन आहे, याबाबत सांगत नाही. एखादे पीक काढण्यासाठी या मातीत नत्राची कमतरता असेल तर त्यात नत्र टाकावे, असा दृष्टिकोन त्यात आहे. हे सध्याच्या ॲलोपॅथीसारखे आहे. या जीवनसत्त्वाची कमतरता असेल तर एक गोळी घ्या, असे करून चालणार नाही. मुळात मातीतील सेंद्रिय पदार्थ वाढणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्हाला चांगले अन्न मिळून सशक्त राहाल. जर मातीला खतांची गरज असल्यास ठरावीक काळासाठी डॉक्टर ज्या पद्धतीने गोळ्या देतात त्या पद्धतीने खते द्यावीत. सध्या आपण खते गरज किती आहे हे न बघता, केवळ जमिनीत फेकून देत आहोत. 

तांबड्या रंगाची वाळवंटे 
तुम्ही विमानातून प्रवास करत असल्यास तुम्हाला पश्चिम घाट व ईशान्येकडील राज्ये वगळता केवळ तांबड्या रंगाचे वाळवंट दिसून येईल. जमिनीवरील आच्छादन म्हणजे ‘ह्युमस’ घटल्याने ही परिस्थिती झाली आहे. त्यामुळे सूक्ष्मजीवांची संख्या कमी होत आहे.  तुमच्या माझ्या वैयक्तिक प्रयत्नांमधून हे बदलणे शक्य नाही. त्याच्यावर जागतिक स्तरावरच प्रयत्न होणे गरजेचे आहे. पृथ्वी म्हणजे केक नाही की प्रत्येकाने आपापला तुकडा घेतला. देशााच्या सीमा या मानवासाठी आहेत. ती आपण आखलेली रेघ आहे. पृथ्वी ही एकजिनसी आहे. प्रत्येक बदलाचे परिणाम हे जागतिक पातळीवर  होणे गरजेचे आहे.

आरोग्याची अतिरेकी काळजी आजारपणाचे लक्षण
आपण आहार, आरोग्य याबाबत चुकीच्या पद्धतीने विचार करत असतो. आरोग्याची अतिरेकी काळजी हे आजारपणाचे लक्षण आहे. पोटाला अन्नाची भाषा कळते. त्यामुळे कधी, काय आणि किती खावे, हे समजले पाहिजे. आजकाल कोणत्याही कार्यक्रमात जेवणामध्ये २०-२५ पदार्थ असतात. उपस्थित लोकही सर्व पदार्थ वाढून घेऊन त्याचा आस्वाद घेतात. ही सवय दवाखान्याचा रस्ता दाखवते. त्यामुळे एकाच वेळी एवढे पदार्थ खाण्याऐवजी एखादाच पदार्थ खाणे योग्य ठरते.

 जागतिक पातळीवर धोरणाची गरज 
आम्ही सध्या कावेरी नदीच्या खोऱ्यात ८३ हजार वर्ग किलोमीटर क्षेत्रात ५२ लाख शेतकऱ्यांसोबत काम 
करत आहोत. परंतु केवळ हे पुरेसे नाही. मातीचे पर्यावरणशास्त्र जागतिक पातळीवर सुधारणे गरजेचे आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संस्थेच्या अहवालानुसार दरवर्षी जीवाणूच्या २७ हजार प्रजाती नष्ट होत आहेत. पुढील २५ ते ४० वर्षांनंतर ही स्थिती आणखी बिकट होईल. सूक्ष्मजीव केवळ तुमच्याच जमिनीत वाढवून उपयोगाचे नाही. ते सर्वत्र झाले पाहिजे. त्यासाठी जागतिक पातळीवर धोरणाची गरज आहे.

झोप ही विश्रांती नव्हे!
- ‘शरीराला विश्रांती आवश्यक असते. मात्र, प्रत्येक वेळी झोप म्हणजे विश्रांती नव्हे. झोप ही तात्पुरता आलेला मृत्यू असतो, असे मला वाटते. आपण एका दिवसात ८ तास झोपत असू, तर आयुष्यातील एकतृतीयांश वेळ आपण झोपलेले असतो. प्रत्येकाच्या शरीराचे आहाराचे, आरोग्याचे गणित वेगवेगळे असते.
- तुम्हाला पावभाजी, डोसा, इडली, चिली, असे चविष्ट पदार्थ खाण्याचा मोह होत नाही का, असे विचारले असता, माझ्या हातचा मसाला डोसा खाल, तर माझे गुलाम व्हाल, अशी मिश्कील टिप्पणी सद्गुरू यांनी केली.

चांगले खाल्लेच पाहिजे
तुम्ही चांगले खाल्लेच पाहिजे. मात्र, त्याचा अतिरेकही टाळायला हवा. 
मातीचा दर्जा घसरत असल्याने आपल्या अन्नाचा दर्जाही खालावत चालला आहे. अन्नातील ९० टक्के पोषक घटक कमी झाले आहेत.
फळे, भाज्या यांतील सूक्ष्म पोषक घटकही गेल्या १०० वर्षांत कमी होत चालले आहेत. मातीचे संवर्धन न होणे हे यामागचे कारण आहे.

Web Title: Conserve soil, otherwise the world will suffer from drought! Sadguru's warning; Awakening of 'Save Soil' on the platform of 'Lokmat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.