आयव्हीएफ उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आणण्याचा विचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:14 AM2021-09-08T04:14:00+5:302021-09-08T04:14:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चाकण : ग्रामीण भागात वंध्यत्वाच्या समस्येवर आधुनिक उपचारपद्धती असलेल्या ‘आयव्हीएफ’सारखे उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चाकण : ग्रामीण भागात वंध्यत्वाच्या समस्येवर आधुनिक उपचारपद्धती असलेल्या ‘आयव्हीएफ’सारखे उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या कक्षेत आणण्याकरता आरोग्य विभाग प्रयत्न करेल, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले.
अरगडे हॉस्पिटल व प्रसूतिगृहात जिल्ह्यातील पहिल्या नेस्ट टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या उद्घाटन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी आमदार दिलीप मोहिते पाटील, डॉ. रत्नाकर महाजन, माजी आमदार राम कांडगे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश अरगडे, अरगडे हॉस्पिटलचे संचालक डॉ. असित अरगडे, अॅड. सुप्रिया अरगडे आदी उपस्थित होते.
राजेश टोपे म्हणाले, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याकरता एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून ५ हजार कोटीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. यातून ग्रामीण रुग्णालय सक्षम होण्यास मदत होईल. चांगल्या आरोग्य सुविधासाठी केंद्र व राज्य सरकारकडून प्रयत्न होताहेत. तालुकास्तरावर असे नवतंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात डॉ. अरगडे पितापुत्रांनी पुढाकार घेऊन वंध्यत्वाची समस्या असलेल्या दाम्पत्याला संततीप्राप्तीचा आनंद देण्याचे त्यांचे काम उल्लेखनीय आहे.
आमदार दिलीप मोहिते पाटील म्हणाले, उत्तर पुणे जिल्ह्यातील वंध्यत्वासारख्या समस्येवर उपचार चाकणला उपलब्ध झाल्याने येथील रुग्णांची परवड होणार नाही. वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी अरगडे पिता-पुत्र डॉक्टरांचा आदर्श घ्यावा.
गेल्या १५ वर्षात ३५०० वंध्यत्व उपचार व सुमारे सात हजार यशस्वी प्रसूती केल्यानंतर वंध्यत्व उपचारांतील अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या टेस्ट ट्यूब बेबीची सुविधा या अगदी माफक दरात उपलब्ध करून दिली जात आहे, असे डॉ. असित अरगडे यांनी सांगितले.
खेड तालुका प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण, तहसीलदार वैशाली वाघमारे, सिव्हिल सर्जन डॉ. अशोक नांदापूरकर, तालुका आरोग्याधिकारी डॉ. बळीराम गाढवे, पोलीस निरीक्षक अशोक राजपूत, मुख्याधिकारी अंकुश जाधव, नानासाहेब कामठे, प्रकाश पाटील, आरोग्याधिकारी डॉ. गणपतराव जाधव, डॉ. नंदा ढवळे, डॉ. भगवान काकणे यांना अरगडे हॉस्पिटलकडून टोपे यांच्या हस्ते कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
फोटो :
070921\1448-img-20210907-wa0022.jpg
फोटो - चाकणला अरगडे हॉस्पिटल टेस्टी ट्यूब बेबी सेंटरचे उद्घाटन करताना मान्यवर