अकरावी प्रवेशासाठी सीईटीचा विचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:11 AM2021-05-16T04:11:29+5:302021-05-16T04:11:29+5:30
पुणे : एकीकडे दहावीचे अंतर्गत मूल्यमापन कसे होईल, हे स्पष्ट नसताना आता अकरावी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्याचा ...
पुणे : एकीकडे दहावीचे अंतर्गत मूल्यमापन कसे होईल, हे स्पष्ट नसताना आता अकरावी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्याचा विचार सुरू झाला आहे. मात्र, तरीही अनेक प्रश्न अनुत्तरित राहत आहेत. त्यामुळे दहावी निकाल व अकरावी प्रवेशाचा प्रश्न केव्हा सुटणार, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
कोरोनामुळे इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या. मात्र, विद्यार्थ्यांच्या परीक्षाच नाही तर पुढील प्रवेश कसे द्यायचे, असा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे सध्या दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करावा की अकरावी प्रवेशासाठी सीईटी घ्यावी, याबाबत शिक्षण विभागाकडून चाचपणी केली जात आहे. मात्र, तंत्रशिक्षण विभागाचे प्रवेश कसे देणार? याचा विचार अद्याप झालेला नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.
--------------------
इयत्ता अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेतली जाणार असली तरी ती ऑनलाईन घेणार की ऑफलाइन, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ऑनलाइन सीईटी घेतल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे काय? आणि ऑफलाईन सीईटी घेतल्यास कोरोनापासून विद्यार्थ्यांचे संरक्षण कसे करणार? असा प्रश्न उपस्थित होतो.
--------------
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल अंतर्गत गुणांच्या आधारे जाहीर करण्याबाबत शिक्षण विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले. परंतु,वर्षभर शाळांनी विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन केले आहे का? अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर केल्यास तो पारदर्शक पद्धतीने तयार केलेला असेल का? अशी शंका उपस्थित केली जात आहे.
-------------------
शिक्षण विभागातर्फे मागील वर्षी पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीच्या १ लाख ७ हजार १२५ जागांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, केवळ ७१ हजार ७२२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.
-------------
इयत्ता अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेतली जात असली, तरी तंत्रनिकेतन व आयआयटी प्रवेश कोणत्या गुणांच्या आधारे दिले जाणार हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.
------
इयत्ता अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन सीईटीच्या पर्यायाचा विचार करावा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेणे धोकादायक आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास अडचणी येऊ शकतात. परंतु, ही परीक्षा एक आठवडाभर घेतल्यास विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाहीत.
डॉ. राजेंद्र झुंजारराव, प्राचार्य, मॉडर्न महाविद्यालय शिवाजीनगर
--------------
प्रथमतः इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यासंदर्भातला निर्णय होण्याची आवश्यकता आहे. अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करावा की इतर पर्यायांचा विचार करावा. हे निश्चित झाल्यानंतरच अकरावी प्रवेशासंदर्भात विचार करणे उचित ठरेल.
- अविनाश ताकवले, माजी प्राचार्य,
---------
इयत्ता अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे गरजेचे आहे. अंतर्गत मूल्यमापनात पारदर्शकता राहील का हे सांगता येत नाही. तसेच अनेक शाळांनी वर्षभर विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन केलेले नाही. त्यामुळे सीईटी चा पर्याय उचित ठरू शकतो.
एम. बी. दराडे, शिक्षक, मोझे हायस्कूल, येरवडा
----------