वाहनसंख्या तसेच गल्लीबोळ लक्षात घेता हेल्मेट ‘हायवे’लाच बरे : गिरीश बापट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 07:28 PM2019-06-14T19:28:19+5:302019-06-14T19:47:46+5:30
‘‘पुण्याची एकूण वाहनसंख्या तसेच गल्लीबोळांचे स्वरूप लक्षात घेता हेल्मेट सक्ती फक्त हायवे वरच असावी असे वाटते,
पुणे : हेल्मेट ‘हायवे’ लाच बरे, असे मलाच नाही तर अनेकांना वाटते असे खासदार गिरीश बापट यांनी सांगितले. पोलिस त्यांना वरिष्ठांकडून येणाऱ्या आदेशाप्रमाणे काम करतात. त्यांना अपघात कमी करायचे आहेत, मात्र त्यासाठी आणखीही उपाय आहेत. या संदर्भात आपण पोलिस आयुक्तांशी बोलू असे ते म्हणाले.
लोकसभेच्या १७ जूनपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाला खासदार म्हणून प्रथमच उपस्थित राहण्यासाठी जाण्यापुर्वी बापट यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. त्यात हेल्मेट सक्तीचा प्रश्न उपस्थित होताच बापट म्हणाले, ‘‘पुण्याची एकूण वाहनसंख्या तसेच गल्लीबोळांचे स्वरूप लक्षात घेता हेल्मेट सक्ती फक्त हायवे वरच असावी असे वाटते, मात्र कायदा आहे, त्याचे पालन करायला हवे. युवकांकडून फारच वाईट पद्धतीने वाहने चालवली जातात, त्यातून अपघात होतात. त्यामुळेच अपघात कमी करायचे असतील तर त्यासाठी अनेक उपाय आहेत. एकेरी वाहतूकीत शिरणारे, ट्रिपल शीट जाणारे, वेगमर्यादा न पाळणारे तसेच मद्यपान करून गाडी चालवणारे अशांवर कारवाई व्हायला हवी.’’
पुण्याचे काही मोठे प्रकल्प रखडले आहेत असे स्पष्ट करून बापट म्हणाले, त्यासाठीच खासदार झाल्यानंतर लगेचच जिल्हाधिकारी, आयुक्त यांची आढावा बैठक घेतली. त्यात याविषयी चर्चा केली आहे. २४ तास पाणी योजनेच्या कामात कुचराई करणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही. या योजनेच्या कामाचा दर आठवड्याला अहवाल देण्याबाबत आयुक्तांना सांगितले आहे. पालखी मार्गाच्या कामाबाबतही संबधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. कॅन्टोन्मेट तसेच केंद्र सरकारशी संबधित असे रेल्वे, विमानतळ याबाबतचे काही प्रश्न आहेत. स्मार्ट सिटी बाबतही काही कल्पना आहेत. या सर्व गोष्टींचा आता सातत्याने आढावा घेत राहून अधिकाऱ्यांना कार्यप्रवण केले जाईल. काम करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल.