पुणेकरांना तूर्तास दिलासा; पण कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आली नाही तर कडक निर्बंध आणणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 03:01 PM2021-03-18T15:01:56+5:302021-03-18T15:11:33+5:30
पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना संकट पुन्हा एकदा डोके वर काढू लागले आहे.
पुणे : पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना संकट पुन्हा एकदा डोके वर काढू लागले आहे. बुधवारी पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या पाच हजाराच्या आसपास पोहचली होती. गुरुवारी पण कालचीच पुनरावृत्ती आढळून आली असून दुपारपर्यंत कोरोना बाधितांचा आकडा ५ हजारांच्या आसपास पोहचला आहे. याच धर्तीवर प्रशासनाकडून पुणेकरांवर कठोर निर्बध आणण्याचा विचार सुरु असल्याची चर्चा सुरु होती. मात्र तूर्तास पुणेकरांना प्रशासनाने दिला दिला असून आगामी काळात जर कोरोना रुग्णांची वाढ नियंत्रणात आली नाही तर कठोर पावले उचलण्यात येणार असल्याचे स्प्ष्ट संकेत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले आहे.
पुण्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महपौर मुरलीधर मोहोळ यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी निर्बंध वाढीवर भाष्य केले. मोहोळ म्हणाले, कोरोना रुग्णांची वाढती लक्षात घेता शहरातील सार्वजनिक वाहतूक, स्विमिंग पूल यावर निर्बंध लावण्याची चर्चा झाली. जम्बो हॉस्पिटलमध्ये २०० बेड वाढविण्यात येणार आहे. तसेच कोरोना चाचण्या वाढवण्यावर देखील भर देण्यात येणार आहे. लसीकरण आणि चाचण्या योग्य प्रकारे झाल्यास लॉकडाऊनची वेळ येणार नाही. बसमध्ये ५० टक्के क्षमतेने प्रवास करता येणार आहे.
कोरोना रुग्णांची वाढ कायम राहिली तर नाईलाजास्तव कडक निर्बंध आणावे लागणार
कोरोना रुग्णांची वाढ कायम राहिली तर नाईलाजास्तव कडक निर्बंध आणावे लागणार आहे. शहरातील उद्याने, जलतरणतलाव, पीएमपी बससेवा, सिनेमा गृहे, मॉल यावर नक्कीच बंधने आणावी लागतील तसेच शहरातील दुकाने देखील ठराविक वेळेत सुरु ठेवण्याचा विचार होऊ शकतो.
पुणे महानगरपालिका आणि क्षत्रिय कार्यालयात होणारी गर्दी हे काळजीचे कारण आहे. आरोग्य सुविधा वाढवणे हा एकच पर्याय असेल. लॉकडाऊन करणे हा उपाय नाही. सध्या काळात गृहविलगीकरणात ८० टक्के कोरोना रुग्ण उचार घेत आहे. लसीकरण प्रक्रियेचा १०० केंद्रावरून २ लाखांचा टप्पा पूर्ण होत आहे. लसीकरण वाढवण्याची भूमिका असणार आहे. पहिला डोस घेताना कोव्हीशिल्ड की कोव्हक्सिन असा कुठलाही विचार करू नये.
केंद्राने महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, औरंगाबाद या शहरांकडे लक्ष द्यावे. सद्यस्थितीत पुण्यात दिवसाला १० ते १२ हजारांच्या आसपास लसीकरण होत आहे. ते वाढवून ३० ते ४० हजारांमध्ये होणे गरजेचे आहे. अशा प्रकारे पूर्ण शहराचे लसीकरण होऊ शकते. ४००० च्या आसपास बेड आहेत. ते सुद्धा वाढवण्याचे प्रयत्न आहेत. जम्बोमध्ये २०० ऑक्सिजन बेड सुरू करतोय. १६०० बेडचे नियोजन पूर्ण झाले आहे. शहरातल्या आठ ठिकाणी बेड उपलब्ध करत आहोत. चाचण्या वाढवण्यात येणार आहेत.
लॉकडाऊन हा मार्ग नाही. परिस्थिती गंभीर झाली तर लॉकडाऊन करता येईल. आरोग्य सुविधा, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन उपलब्ध करणे, लसीकरण वाढवणे, या सर्व गोष्टी नियोजित केल्यास लॉकडाऊनची वेळ येणार नाही. भविष्यात संख्या वाढली तर अजून कडक निर्बंध करावे लागतील.