पुणेकरांना दिलासा : कोरोना पॉझिटिव्हिटी रेट आजपर्यंतचा सर्वात कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:11 AM2021-07-25T04:11:26+5:302021-07-25T04:11:26+5:30
पुणेकरांमध्ये सामूहिक प्रतिकारशक्ती वाढत चालल्याचे हे निदर्शक आहे, असे महापालिकेचे साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. संजय वावरे यांनी सांगितले. कोरोनाच्या ...
पुणेकरांमध्ये सामूहिक प्रतिकारशक्ती वाढत चालल्याचे हे निदर्शक आहे, असे महापालिकेचे साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. संजय वावरे यांनी सांगितले. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील सर्वात कमी पॉझिटिव्हिटी रेट आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील पॉझिटिव्हिटी रेट पाचपेक्षा कमी नोंदला जात आहे. शुक्रवारी पॉझिटिव्हिटी रेट २.९७ होता. आज त्यामध्ये आणखी घट होऊन पॉझिटिव्हिटी रेट २.३७ टक्के झाला. पुणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांत झपाट्याने कमी झाली आहे. दुसरी लाट असताना पुणे शहराचा पॉझिटिव्हिटी रेट हा १५ टक्क्यांच्या वर गेला होता.
महापालिकेच्या वतीने शहरात कोणते निर्बंध लावायचे हे पॉझिटिव्हिटी रेट आणि उपलब्ध असलेले ऑक्सिजन बेड यावर ठरते. शहरातील रिक्त ऑक्सिजन बेडची संख्याही वाढली आहे. त्यामुळे पुणेकरांवरील निर्बंध कमी होण्याची शक्यता आहे. याबाबत सोमवारी निर्णय होणार आहे.
कोट
लसीकरणाचे वाढते प्रमाण आणि मोठ्या संख्येने बरे झालेले कोरोना रुग्ण पुण्यात आहेत. त्यामुळे शरीरात अँटीबॉडी (प्रतिपिंडे) असणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे. पुणेकरांमध्ये सामूहिक प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) वाढत चालल्याचे हे द्योतक आहे. त्यामुळेच चाचण्या वाढल्या असल्या तरी रुग्णांची संख्या कमी होत आहे.
- डॉ. संजीव वावरे, साथरोग नियंत्रण अधिकारी, पुणे महापालिका
पुण्यातील गेल्या दहा दिवसांतील पॉझिटिव्हिटी रेट
१४ जुलै- ४.०८
१५जुलै - ४.३३
१६ जुलै- ३.५५
१७जुलै - ३.९८
१८ जुलै- ५.१५
१९ जुलै- ३.१२
२० जुलै- ३.८४
२१ जुलै- ३.५६
२२ जुलै- ४.२७
२३ जुलै- २.९७
२४ जुलै- २.३७