आषाढी अन् बकरी ईदनिमित्त पुणेकरांना दिलासा; शहरात आजपासून नियमित पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2022 09:55 AM2022-07-08T09:55:03+5:302022-07-08T09:55:20+5:30
धरणातील पाणीसाठा कमी असल्याने खबरदारी म्हणून पुणे महापालिकेने शहरात ४ ते ११ जुलैपर्यंत प्रारंभी दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला हाेता
पुणे : धरणातील पाणीसाठा कमी असल्याने खबरदारी म्हणून पुणे महापालिकेने शहरात ४ ते ११ जुलैपर्यंत प्रारंभी दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला हाेता; मात्र १० जुलै रोजी आषाढी एकादशी आणि बकरी ईद असल्याने आजपासून (शुक्रवार) शहरात पूर्वीप्रमाणे दररोज नियमित पाणीपुरवठा होणार आहे.
दरम्यान, दिवसाआड पाणीपुरवठा झाल्याने शेकडो सदनिका असलेल्या सोसायट्यांना टँकरचा आधार घ्यावा लागला. काही ठिकाणी पाणीपुरवठा बंद असताना जलवाहिन्यांमध्ये हवा साठली होती. त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या दिवशी पाण्याच्या दाबावर त्याचा परिणाम झाला. काही वेळाने पाणीपुरवठा सुरळीत झाला. तांत्रिक समस्या होत्या, तिथे टँकर पाठविण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली; मात्र ज्या भागात पाणीपुरवठा बंद होता त्या ठिकाणी महापालिकेने टँकर पाठविले नाहीत, हेही कबूल केले.
दरम्यान, पर्वती जलकेंद्रावर अवलंबून असलेल्या मध्यवर्ती पेठांमधील काही भागात गुरुवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. त्यामुळे टाक्याही भरल्या नाहीत. या भागातील ४० हून अधिक ठिकाणांहून टँकरसाठी मागणी केली गेली. मात्र, पालिकेच्या ठेकेदाराने वेळेत टँकर पुरवले नाहीत. त्यामुळे नागरिकांची विशेषतः महिलावर्गाची अडचण झाली असल्याचे शहर काँग्रेसचे सरचिटणीस ऋषिकेश बालगुडे यांनी सांगितले.
टँकर पॉईंटवर किती पाणी मुरते?
दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ज्या भागात पाणीपुरवठ्याचे नियोजन होते. तेथे किती पिण्याच्या पाण्याचे टँकर पाठविण्यात आले याची नोंद महापालिकेच्या दप्तरी नाही. मुख्य विभागात विचारणा केली तर टँकर पॉईंटवरून ही माहिती आलेली नाही, ती महिनाअखेरीस येईल, असे अजब उत्तर देण्यात आले. गेली कित्येक दिवस टँकर पॉईंटवरून टँकर दिले जातात; पण याची रोजच्या रोज माहिती मुख्य खात्याला मिळतच नाही. त्यामुळे या टँकर पॉईंटवर किती पाणी मुरते याचा शोध घेणे गरजेचे आहे.