पुणे-पिंपरीच्या विकासासाठी एकत्रित ‘स्मार्ट’ शिफारस
By Admin | Published: August 1, 2015 04:36 AM2015-08-01T04:36:08+5:302015-08-01T04:36:08+5:30
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक, मेट्रो प्रकल्प व नदीसुधारणा प्रकल्पात साम्य आहे. त्यामुळे दोन्ही शहरांच्या एकात्मिक विकासासाठी स्मार्ट सिटी म्हणून एकत्रित शिफारस
- हणमंत पाटील, मुंबई
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक, मेट्रो प्रकल्प व नदीसुधारणा प्रकल्पात साम्य आहे. त्यामुळे दोन्ही शहरांच्या एकात्मिक विकासासाठी स्मार्ट सिटी म्हणून एकत्रित शिफारस करण्यात आली आहे, अशी माहिती प्रधान सचिव डॉ. प्रवीण परदेशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना शुक्रवारी दिली.
केंद्र शासन पुरस्कृत ‘स्मार्ट सिटी’ अभियनाच्या अंमलबजावणीस राज्य मंत्रिमंडळाने २३ जुलैला मान्यता
दिली होती. त्यानुसार मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार
समिती स्थापन करण्यात आली
होती. राज्यातील सर्व शहरांच्या
स्मार्ट सिटी योजनेच्या
अहवालाचा अभ्यास करून
समितीने पहिल्या टप्प्यात
१० शहरांची शिफारस केंद्राकडे करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये मुंबईनंतर प्रामुख्याने पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांची एकत्रित शिफारस केली आहे, असे परदेशी यांनी सांगितले.
ते म्हणाले, पुणे व पिंपरी-चिंचवड शहरे मुळा आणि मुठा नदींवर वसलेली आहेत. त्यामुळे केवळ एका शहरातील नदीची सुधारणा करून चालणार नाही.
पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अखत्यारीत पुणे व पिंपरी महापालिका आहेत. दोन्ही शहरांतील नागरिकांची वाहतूक, पाणीपुरवठा, मैलापाणी प्रक्रिया, कचरा व्यवस्थापन व अनधिकृत बांधकामांची समस्या जवळजवळ सारख्या स्वरूपाची आहे. त्यामुळे दूरगामी विकास योजनांचा विचार करून दोन्ही शहरांची स्मार्ट सिटी योजनेसाठी एकत्रित शिफारस करण्यात आली आहे, असे परदेशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
तसेच, पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था दोन्ही शहरांतून एकत्रित आहे. प्रस्तावित मेट्रो प्रकल्पात दोन्ही शहरांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे प्रस्तावित रिंगरोड याच शहरांभोवती उभारण्यात येणार आहे. दोन्ही शहरांतून जाणारे वाहतूक प्रकल्प एकाच प्रकारचे असल्याने ही योजना राबविताना एकत्रित विचार करणे हिताचे ठरेल, अशी चर्चा या वेळी करण्यात आली.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांतील सार्वजनिक वाहतूक, मेट्रो प्रकल्प, बीआरटी योजना व नदी सुधारणा प्रकल्पात साम्य आहे. त्यामुळे दोन्ही शहरांत एकात्मिक स्मार्ट सिटी योजना राबविणे नागरिकांच्या हिताचे ठरणार आहे.
- प्रवीण परदेशी, प्रधान सचिव.