आमच्या विरोधात षड्यंत्राचा डाव
By admin | Published: July 24, 2015 03:57 AM2015-07-24T03:57:59+5:302015-07-24T03:57:59+5:30
एफटीआयआयचे कर्मचारी संजय चांदेकर यांनी विद्यार्थ्यांविरोधात पोलीस ठाण्यामध्ये केलेली तक्रार चुकीची आणि निराधार आहे.
पुणे : एफटीआयआयचे कर्मचारी संजय चांदेकर यांनी विद्यार्थ्यांविरोधात पोलीस ठाण्यामध्ये केलेली तक्रार चुकीची आणि निराधार आहे. त्यादिवशी जे काही घडले त्या सर्व घटनेचे आॅडियो आणि व्हिडिओ क्लिपिंग्स आमच्याकडे उपलब्ध असून, आमच्याविरोधात षड्यंत्र रचले जात आहे. दोन दिवसांनंतर गुन्हा कसा काय दाखल होऊ शकतो, असा सवाल उपस्थित करीत या प्रकरणाची योग्य आणि पारदर्शक चौकशी व्हावी, अशा मागणीचे निवेदन स्टुडंट्स असोसिएशनने संचालक प्रशांत पाठराबे यांना गुरुवारी दिले.
सेव्ह एफटीआयआय अंतर्गत संजय चांदेकर यांनी, विद्यार्थ्यांनी दमदाटी करून धमकावले, कॉर्नर करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप विद्यार्थ्यांवर करीत दोन दिवसांपूर्वी डेक्कन पोलीस ठाण्यात अर्ज सादर केला होता. त्यावर दोन दिवसांनी कार्यवाही होत विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने असोसिएशनने आश्चर्य व्यक्त केले आहे. या संदर्भात माहिती देताना असोसिएशन प्रमुख राकेश शुक्ला म्हणाला, ‘‘आमच्या विरोधात षड्यंत्र रचले जात आहे. यामागे कोण शक्ती कार्य करीत आहे, याचा शोध लागला पाहिजे, या आंदोलनात जाणीवपूर्वक विवाद उपस्थित केला जात आहे.’’
विनापरवाना वसतिगृहाचा वापर करणाऱ्यांना नोटिसा
एफटीआयआयचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतरही संचालकांची परवानगी न घेता वसतिगृहाचा वापर करणाऱ्या १३ विद्यार्थ्यांना नोटीस देण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे विद्यार्थी या नोटिशीला पात्र ठरले आहेत. एप्रिलमध्ये विद्यार्थ्यांना नोटीस देण्यात आली होती. केअरटेकरच्या सुधारित आकडेवारीनुसार संख्या जास्त दिसल्यामुळे पुन्हा ही नोटीस बजावण्यात आली आहे. १२ विद्यार्थ्यांनी दोन दिवसांमध्ये वसतिगृह सोडले असल्याचे सांगण्यात आले आहे.
संस्थेच्या परिसरात
पोलीस बंदोबस्त
काही दिवसांपूर्वी संस्थेच्या बाहेर विद्यार्थ्यांनी उभारलेल्या प्रश्नचिन्हाची मोडतोड झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी संस्थेच्या परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी देखील कडक सुरक्षाव्यवस्था ठेवली आहे, ही एक शासकीय संस्था असूनही विद्यार्थ्यांना किंवा एखाद्या अधिकारी अथवा कर्मचाऱ्याला भेटण्यासाठी त्यांना दूरध्वनी घेऊन बाहेर बोलावण्याचा नवा नियम सुरू करण्यात आला आहे.
राकेश शुक्लाला नोटीस
गेल्या ४४ दिवसांपासून एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेले आंदोलन आता चिरडण्याचे प्रयत्न शासनदरबारी सुरू झाले आहेत. ज्या १३ विद्यार्थ्यांना संचालकांनी नोटीस बजावली आहे, त्यामध्ये आंदोलन प्रमुख राकेश शुक्लाचाही समावेश आहे. त्याचा अभ्यासक्रम पूर्ण झाला असून, केवळ प्रबंध सादर करण्याचे काम शिल्लक आहे, तरीही त्याला नोटिशीला पात्र ठरविण्यात आले आहे. मात्र, यासंदर्भात तो संचालक प्रशांत पाठराबे यांच्याशी बोलणार असल्याचे समजते.
‘एफटीआयआय’मधील विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल
एफटीआयआयमधील कर्मचारी संजय चांदेकर यांना धमकाविल्याबद्दल बुधवारी रात्री उशिरा विद्यार्थ्यांच्या विरोधात बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला असून, तो डेक्कन पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला आहे. मात्र, घटना घडल्यानंतर दोन दिवसांनी गुन्हा नोंद झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
संजय चांदेकर हे एफटीआयआयमध्ये कम्युनिटी रेडिओचे काम करतात. मागील आठवड्यात चांदेकर यांनी संस्थेतील विश्वास नेर्लेकर आणि दोन माजी कर्मचारी सदाशिव फडके व पुराणिक अशा चौघांसमवेत पत्रकार परिषद घेऊन आंदोलन करणारे विद्यार्थी संस्थेत गैरप्रकार करतात असे सांगत गजेंद्र चौहान आणि सदस्यांना काम करू दिले जावे, अशी भूमिका चौघांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली होती. त्याचबरोबर गजेंद्र्र चौहान यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर सोमवारी विद्यार्थ्यांनी चांदेकर यांच्याकडे ‘तुम्ही पत्रकार परिषदेत केलेले आरोप कोणत्या आधारे केले?’ अशी विचारणा केली. त्यामुळे चांदेकरांनी, विद्यार्थ्यांनी माझ्यावर दबाव आणून मला कॉर्नर करण्याचा प्रयत्न केला, असे पत्रकारांना सांगितले. विद्यार्थ्यांनी तुम्हाला धमकावले का? या प्रश्नाला त्यांनी नकारात्मक उत्तर दिले. परंतु, मंगळवारी त्यांनी विद्यार्थ्यांनी धमकावल्याची तक्रार पोलिसांकडे दिली. परंतु, दिवसभर काहीही झाले नाही. मात्र, बुधवारी रात्री उशिरा बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आणि तो डेक्कन पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला. विशेष म्हणजे बुधवारी सकाळी विद्यार्थ्यांनी, ३ आॅगस्टला दिल्लीत जाऊन आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले होते.