एकनाथ खडसेंविरोधात दबावतंत्राचे षडयंत्र, राजकीय द्वेषातून कारवाईची भीती- रोहित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 10:47 AM2024-04-08T10:47:46+5:302024-04-08T10:48:16+5:30
खडसे यांच्यावर भाजपकडून दबावतंत्राचे षडयंत्र केले जात आहे, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला....
पुणे : केंद्रातील यंत्रणांच्या माध्यमातून खोट्या फाईल तयार करणे आणि विरोधी पक्षातील नेत्यांना अडचणीत आणण्याचे काम भाजपकडून केले जात आहे. राजकीय द्वेषातून एकनाथ खडसे यांच्यावरही कारवाईची भीती होती. त्यातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) सोडण्याचा निर्णय घेतला असावा. खडसे यांच्यावर भाजपकडून दबावतंत्राचे षडयंत्र केले जात आहे, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या महिला प्रीमिअर लीग स्पर्धेची घोषणा करण्यासाठी रोहित पवार रविवारी पुण्यात आले होते. ते म्हणाले की, खडसे हे लोकांचे नेते आहेत. मात्र त्यांची प्रकृती सातत्याने बिघडत आहे. त्यातच कारवाईच्या भीतीमुळे त्यांनी पुन्हा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असावा. भाजपने अनेक लोकनेत्यांची ताकद कमी केली. एकनाथ खडसे, गोपीनाथ मुंडे या लोकनेत्यांवर अन्याय झाल्याचे आपण पाहिले आहे. अशातच खडसे यांच्यावर कारवाई करून त्यांचा तुरुंगात टाकले असते तर त्यांची प्रकृती आणखी खालावली असती.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत पवार म्हणाले की, भाजपच्या हायकमांडने विनोद तावडे यांना काही महत्त्वाचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील आपले महत्त्व कमी होत असल्याचे पाहून फडणवीस त्रस्त झाले आहेत. राज्यात पक्ष आणि कुटुंब फोडण्याचे काम फडणवीसच करत आहेत. गेल्या काही वर्षांत राज्यातील राजकीय संस्कृती खालावली असून त्यामागे फडणवीसांचाच हात आहे, असेही रोहित पवार म्हणाले.
‘तो“ खेकडा दिसत नाही का?
अनेक मंत्री घोटाळे करून राज्याची तिजोरी पोखरण्याचे काम करत आहेत. तिजोरी पोखरणाऱ्या या भ्रष्टाचारी खेकड्यांच्या नांग्या ठेचल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असे म्हणत रोहित पवार यांनी तानाजी सावंत यांचे नाव न घेता टीका केली. पत्रकार परिषदेत दाखविलेला खेकडा सुरक्षित असून ‘पेटा“ला उत्तर देऊ असेही पवार म्हणाले.
इंदापूरमध्ये सुप्रिया सुळे यांची मते वाढणार
प्रवीण माने यांचा मोठा व्यवसाय आहे. ते मनापासून अजित पवार गटात गेले आहेत की, दबावतंत्राचा वापर करून त्यांना नेण्यात आले आहे हे पाहावे लागेल. पण इंदापूर मधील जनता आणि कार्यकर्ते आमच्या बाजूने आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे यांना मागील लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदा अधिक मतदान होईल, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला.