भारताबद्दल नकारात्मकता पसरवण्याचे कारस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:14 AM2021-08-21T04:14:03+5:302021-08-21T04:14:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “आजच्या काळात भारत वेगाने प्रगती करत आहे. प्रत्येक क्षेत्रात भारत स्वत:ची छाप निर्माण करत ...

Conspiracy to spread negativity about India | भारताबद्दल नकारात्मकता पसरवण्याचे कारस्थान

भारताबद्दल नकारात्मकता पसरवण्याचे कारस्थान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “आजच्या काळात भारत वेगाने प्रगती करत आहे. प्रत्येक क्षेत्रात भारत स्वत:ची छाप निर्माण करत आहे. जगही त्याला मान्यता देऊ लागले आहे. अशा स्थितीत भारताचे यश कमी लेखण्याचा, भारताबद्दल नकारात्मकता पसरवण्याचे कारस्थान जाणीवपूर्वक रचले जात आहे. सोशल मीडियाचा आधार घेऊन मूठभर लोक भारताची प्रतिमा मलिन करीत आहेत. हा कट भारताच्या तरुणांनी हाणून पाडला पाहिजे,” अशी अपेक्षा राज्यपाल जगदीप धनखर यांनी व्यक्त केली.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या श्री नवलमल फिरोदिया लॉ कॉलेजतर्फे आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती अभिनव भारत व्यासपीठाचे, महाविद्यालयातर्फे सुरू करण्यात आलेल्या तीन पदविका अभ्यासक्रमांचे तसेच अटल लिट फेस्टिवल या उपक्रमाचे उद्घाटन राज्यपाल धनखर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ते बोलत होते. राज्यपालांच्या पत्नी सुधेश, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळ परिषदेचे अध्यक्ष शरद कुंटे, महाविद्यालयाचे अध्यक्ष ॲड. नितीन आपटे, उपाध्यक्ष महेश आठवले, सोसायटीचे सचिव धनजंय कुलकर्णी आदी या वेळी उपस्थित होते.

“सन १९८९ मध्ये मी संसदेचा सदस्य होतो तेव्हा ५० गॅस कनेक्शन दिली तरी ते मोठे यश मानले जात होते. आता देशात तब्बल आठ कोटी सामान्यांच्या घरी गॅस पोहोचवण्यात केंद्र सरकार यशस्वी झाले आहे. हा फार मोठा बदल आहे. बँकिंग व्यवस्थेत अगदी छोट्या, शेवटच्या घटकाला स्थान मिळत आहे. तब्बल नऊ-दहा कोटी शेतकऱ्यांना डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या माध्यमातून सरकारी योजनांचा थेट फायदा दिला जात आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेसाठी तयार केले जात आहे. केवळ घोकंपट्टीवर अवलंबून न राहता विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणारे हे धोरण आहे. सर्वसामान्यांचे जीवन समृद्ध करणारे बदल फार गतीने घडत आहेत,” असे प्रतिपादन धनखर यांनी केले.

मात्र, सर्व क्षेत्रांतल्या देशाच्या या घोडदौडीकडे दुर्लक्ष करुन नकारात्मकता माजवण्याचा नियोजनबद्ध प्रयत्न मूठभर लोक करत आहेत. भारताच्या प्रतिमेवर शिंतोडे उडवण्याचा त्यांचा डाव आहे. त्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जात आहे, असे धनखर म्हणाले. “ भारतीय संस्कृती जगात श्रेष्ठ आहे. हजारो वर्षांची परंपरा असणाऱ्या या संस्कृतीची मुळे मजबूत आहेत. भारतीय संविधानाचा आदर करत आपल्याला हिंसामुक्त समाज पुढे न्यायचा आहे. भारताच्या महान परंपरा, यश यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करणाऱ्या मूठभर लोकांचा तरुणांनी ताकदीने मुकाबला केला पाहिजे,” असे आवाहन धनखर यांनी केले. ॲड. आपटे यांनी प्रास्ताविक केले. अनघा बलदोटा यांनी सूत्रसंचालन केले. कुलकर्णी यांनी आभार मानले.

Web Title: Conspiracy to spread negativity about India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.