दौंडमध्ये 'त्यांचा' संसार अधिकृत करण्यासाठी लाच घेणारा वैद्यकीय अधिकारी ACB च्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 07:55 PM2022-10-17T19:55:03+5:302022-10-17T20:05:32+5:30
दौंड ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यासह शिपायाला घेतले ताब्यात...
दौंड (पुणे) : दौंड उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संग्राम डांगे ( वय ४६ )आणि त्यांच्या कार्यालयचा शिपाई, नानासाहेब पांडुरंग खोत ( वय ५७) यांना पाच हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे.
दरम्यान या संदर्भात रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, तक्रारदाराने दुपारी विवाह नोंदणीसाठी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. दरम्यान हे प्रमाणपत्र देण्यासाठी डॉ. संग्राम डांगे यांनी पाच हजार रुपये मागितले होते. ग्रामीण भागात विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्याचे अधिकार वैद्यकीय अधिकाऱ्यांना असतात.
तक्रारदार पाच हजार रुपये घेऊन आला असता यावेळी डॉ. संग्राम डांगे आणि नानासाहेब खोत यांना पाच हजार रुपये घेताना रंगेहात पकडले. शिपायाने पाच हजार रुपये घेतले तेव्हा लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी या शिपायाला रंगेहात पकडले. त्यानुसार दोघांवर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ माने, दिनेश माने, भूषण ठाकूर, प्रकाश तावरे सहभागी झाले होते. या कारवाईमुळे जिल्ह्यातील आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.