Baramati: सत्र न्यायालयात गार्डची ड्यूटी संभाळणारा हवालदार लाचप्रकरणी ACB च्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 05:34 PM2021-12-07T17:34:57+5:302021-12-07T17:43:05+5:30
पुणे ग्रामीण पोलीसांच्या मुख्यालयात कार्यरत असणाऱ्या गदादे यांची त्यांची नेमणूक बारामती सत्र न्यायालयात गार्ड म्हणून करण्यात आली आहे...
बारामती: पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Pune) बारामती सत्र न्यायालयात ‘गार्ड’ची ‘ड्युटी’ संभाळणाऱ्या हवालदारास लाचप्रकरणी ताब्यात घेतले आहे. माणिक गदादे असे या पोलिस हवालदाराचे नाव आहे. पुणे ग्रामीण पोलीसांच्या मुख्यालयात कार्यरत असणाऱ्या गदादे यांची त्यांची नेमणूक बारामती सत्र न्यायालयात गार्ड म्हणून करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या मुख्यालयात ते कार्यरत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांची येथे गार्ड म्हणून नेमणूक झाली होती.
गदादे यांनी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून एक स्कॉर्पिओ ओढून आणली होती. या वाहनाचा दरोड्याच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे त्यांनी वाहनमालकाला सांगत वाहन सोडण्यासाठी ५० हजाराच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार दिली होती. मात्र, अॅन्टीकरप्शनने केलेल्या चौकशीत गदादे यांनी तडजोडीअंती लाच मागितल्याचे निष्पन्न झाले आहे.
त्यानुसार मंगळवारी(दि ७) दुपारी त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील प्रक्रिया सुरु आहे. पोलीस अधिक्षक राजेश बनसोडे, अप्पर अधिक्षक सुरज गुरव, अप्पर अधिक्षक सुहास नाडगौड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.