मतदारसंघ काढला पिंजून
By admin | Published: October 6, 2014 06:38 AM2014-10-06T06:38:38+5:302014-10-06T06:38:38+5:30
साप्ताहिक सुटीच्या रविवारी नागरिक घरी विश्रांती करणे पसंत करीत असल्याने त्यांची भेट देण्याचा उमेदवारांचा धडाका आज दिवसभर कायम होता
पिंपरी : साप्ताहिक सुटीच्या रविवारी नागरिक घरी विश्रांती करणे पसंत करीत असल्याने त्यांची भेट देण्याचा उमेदवारांचा धडाका आज दिवसभर कायम होता. पहाटे सहाला सुरू झालेल्या गाठीभेटींचा सिलसिला रात्री उशिरापर्यंत कायम होता. पायाला अक्षरश: भिंगरी लावल्याप्रमाणे उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला.
निवडणूक आयोगाने प्रचाराला अल्प कालावधी दिला आहे. उमेदवार आणि कार्यकर्त्यांसाठी प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे. सुटीमुळे कुटुंबातील सर्वच सदस्य रविवारी घरी असतात. ही संधी साधत घरोघरी गाठीभेटी घेण्याचा धडाका उमेदवारांनी लावला होता. सकाळी सहाच्या सुमारास ठरावीक कार्यकर्त्यांसह उमेदवार मैदान, पटांगण, टेकडी आणि सार्वजनिक उद्यानात निघाले. तेथे वॉकिंग, जॉगिंग व व्यायाम करणाऱ्या तरुणाईपासून ज्येष्ठांची त्यांनी भेट घेतली. हास्यक्लबमध्ये सहभागी होत थोडासा विरंगुळा करून घेतला.
सकाळी लवकरच वाडी-वस्ती, चाळ, हौसिंग सोसायट्या, बाजारपेठा आदी भागांतून पदयात्रा आणि रॅली काढण्यात आली. घरोघरी जाऊन नागरिकांना भेटून मतदान करण्याचे आवाहन केले जात होते. ज्येष्ठांचे वाकून आशीर्वाद घेतले जात होते. उष्म्यामुळे घामाने माखूनही चालणे बंद नव्हते. घाम पुसत आणि पाण्याचे घोट घेत पदयात्रा सुरूच होत्या. दिवसभरात संपूर्ण परिसर पिंजून काढण्याचा प्रयत्न केला गेला.
रिक्षा व टेम्पोत लावलेल्या स्पीकरवरून ‘आले रे आले....,अशा पद्धतीच्या घोषणा आणि प्रसिद्ध गाण्यांच्या चालीवरील प्रचाराची टेप ऐकवली जात होती. सोबतीला ढोल-ताशाचा दणदणाट होता. सकाळी सुरू झालेली रॅली दुपारच्या कडक उन्हामुळे थांबली. उन्ह कमी होताच सायंकाळी पुन्हा नव्या दम्याने रॅली सुरू झाली. रात्री दहापर्यंत कोणत्याही स्थितीत ठरलेला भाग पूर्ण करण्याच्या इराद्याने कार्यकर्ते चालू लागले. गल्ली व कॉलनीतून फेरी मारत उंच इमारतींच्या गॅलरीत मतदारांना हात उंचावून अभिवादन करीत रॅली पुढे सरकत होती.
थकल्याने काही ठिकाणी उघड्या जीप किंवा मोटारीत उभे राहून उमेदवार रॅलीत अभिवादन करीत होते. वाढते ऊन, आवाजाचा दणदणाट, गर्दी, धूळ आदीमुळे रात्रीपर्यंत उमेदवार आणि कार्यकर्ते पार गळून गेले होते. रात्री दहाच्या ठोक्याला रॅली थांबविली गेली. रिक्षावरील स्पीकर बंद झाले. तेथून ठरावीक कार्यकर्त्यांना घेऊन उमेदवार निघून गेले. काही प्रमुख व्यक्तींशी भेट घेत गुप्त बैठका झाल्या, त्या मध्यरात्रीपर्यंत सुरूच होत्या.