प्रत्येक धर्मासाठी संविधानच धर्मग्रंथ : शमशुद्दीन तांबोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 03:47 PM2018-02-03T15:47:34+5:302018-02-03T15:53:51+5:30
देशात संविधान हे सर्वोच्च असल्याने भारतातील सर्व धर्मियांसाठी हाच धर्मग्रंथच असला पाहिजे, असे मत मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. शमशुद्दीन तांबोळी यांनी मांडले.
पुणे : देशात संविधान हे सर्वोच्च असल्याने भारतातील सर्व धर्मियांसाठी हाच धर्मग्रंथच असला पाहिजे, असे मत मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. शमशुद्दीन तांबोळी यांनी मांडले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘भारतीय संविधान आणि मुस्लीम महिलांचे प्रश्न’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी विभागप्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे, डॉ. विद्यागौरी टिळक, सीएमईचे प्रशासन अधिकारी महादेव कोकणे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. टिळक यांच्या हस्ते पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
डॉ. तांबोळी म्हणाले, की तिहेरी तलाकमुळे मुस्लीम महिलांचे प्रश्न पुन्हा एकदा समाजासमोर आले असताना हे प्रश्न सोडविण्यासाठी भारतीय संविधानातील तरतुदींचा आधार घेणे आवश्यक आहे. धर्मग्रंथातील रूढींचा धर्मवादी संघटनांकडून गैरवापर करून महिलांचे आणखी खच्चीकरण केले जात आहे. सरकारही विधेयकाच्या रूपाने सुधारणा करण्याचे आश्वासन देत असले तरी शरियतच्या नावाखाली सुरु असलेल्या रुढींच्या उच्चाटनासाठी ठोस पावले उचलली जात नाहीत. आत्ताच्या ट्रिपल तलाक विधेयकाबाबतही सरकारची अशीच भूमिका आहे. धर्मातील या जाचक रुढींविरुद्ध लढण्यासाठी पीडित महिलांनीच एकत्र यावे.
समाजातील विविध घडामोडीचे ज्ञान आणि त्यावर विद्यार्थ्यांनी विचारमंथन करावे यासाठी विभागाकडून व्याख्यानमालांचे आयोजन केले जाते. अशा व्याख्यानातून प्रत्यक्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्याशी थेट संवाद साधता येतो, असे मराठी विभागप्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे यांनी सांगितले. व्याख्यानाच्या शेवटी संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात डॉ. तांबोळी यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन शंकानिरसन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामबाबू घुले व सागर सुरवसे यांनी केले तर प्रास्ताविक कपिल कांबळे यांनी केले.