राज्यघटना हाच धर्म
By admin | Published: November 28, 2015 12:36 AM2015-11-28T00:36:22+5:302015-11-28T00:36:22+5:30
‘काही मंडळी स्वार्थासाठी धर्म, जातीच्या नावाखाली समाजात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अशा धर्मापासून दूर राहणेच मला आवडते.
पुणे : ‘काही मंडळी स्वार्थासाठी धर्म, जातीच्या नावाखाली समाजात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अशा धर्मापासून दूर राहणेच मला आवडते. मात्र, एखाद्या दरिद्री माणसाला मदत हवी असेल, तर त्याला पुरवणे हाच मी धर्म मानतो. प्रत्येकाने आपले कर्तव्य हाच धर्म समजला पाहिजे. धर्म ही गोष्ट उंब-याच्या आतच ठेवायला हवी. एकदाउंबरठा ओलांडला की भारतीय राज्यघटना हाच आपला धर्म मानला पाहिजे’,असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्त केले.
विश्वशांती केंद्र, माईर्स एमआयटी, पुणे आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासनाअंतर्गत २० व्या ज्ञानेश्वर-तुकारामस्मृती व्याख्यानमालेतील तिस-या दिवशीच्या प्रबोधन कार्यशाळेत डॉ. जब्बार पटेल‘मनाचे व्यवस्थापन’ या विषयावर बोलत होते.
याप्रसंगी राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व पोलिस महानिरीक्षक (कारागृह) डॉ. भूषणकुमार उपाध्याय, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, विश्वशांती संघाचे कार्यकारी संचालक डॉ. संजय उपाध्ये, माईर्स एमआयटीचे प्राचार्य डॉ. एल. के. क्षीरसागर, स्कूल आॅफ टेलिकॉमचे प्रकल्प संचालक डॉ. मिलिंद पांडे व प्रा. गौतम बापट आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. जब्बार पटेल म्हणाले, ‘प्रत्येक कैदी हा गुन्हेगार नसतो. कैद्यांनाही त्यांच्याकडून नकळत घडलेल्या गुन्ह्याचा पश्चाताप होत असतो. पूर्वनियोजित गुन्ह्यांची संख्या फार कमी असते.
अनेकदा गुन्हे हे भावनेच्या आहारी गेल्यानेच घडतात. त्याची शिक्षा मात्र दीर्घकाळ भोगावी लागते. त्यामुळे आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवून मनाचे व्यवस्थापन करणे उपयुक्त ठरते’,
डॉ. भूषणकुमार उपाध्याय म्हणाले, हिंसेचा जन्ममनात होतो. त्यानंतर ती कृतीत उतरते. मनावर नियंत्रण ठेवणे अतिशय कठिण आहे, असे गीतेमध्ये अजुर्नाने म्हटले आहे. त्यावर उत्तर देताना श्रीकृष्णाने म्हटले आहे, की अभ्यासाने व वैराग्याने हे साध्य करता येते. त्यासाठी आपण सर्वांनी विषयाकडे ओढ घेणारी आपली इंद्रिये आवरुन धरली, तर या जगात विश्वशांती नांदल्याशिवाय राहणार नाही.
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. डॉ. संजय उपाध्ये यांनी आपले मनोगत व्यक्त केली. डॉ. मिलिंद पांडे यांनी स्वागत केले. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन, डॉ. एल. के. क्षीरसागर यांनी आभारप्रदर्शन केले. (प्रतिनिधी)