संवैधानिक मूल्ये हीच आपली ताकद: देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2024 09:40 AM2024-12-01T09:40:49+5:302024-12-01T09:41:16+5:30

भारतीय जैन संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन

Constitutional values are our strength says Devendra Fadnavis | संवैधानिक मूल्ये हीच आपली ताकद: देवेंद्र फडणवीस

संवैधानिक मूल्ये हीच आपली ताकद: देवेंद्र फडणवीस

पुणे : एखादी व्यक्ती मोठी झाल्यानंतर समाजात त्याच्यासाठीची व्यवस्था तयार केली जाते. कधी सरकार तर कधी समाज ही व्यवस्था तयार करत असतो. अशा व्यक्तींच्या मनात समाजासाठी आपले काहीतरी देणे लागते ही भावना असणे अपेक्षित आहे. मात्र, ही भावना नसल्यास अशा व्यक्ती तसेच समाज भरकटू शकतो. त्यासाठी मूल्यांची जपणूक करणे गरजेचे आहे. सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सची गरज असली तरी ह्यूमन इंटेलिजन्सची देखील गरज आहे. मुलांना लहानपणापासूनच संविधानाच्या मूल्यांची जपणूक करायला शिकवायला हवे. संवैधानिक मूल्ये हीच आपली ताकद आहे, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

जैन संघटनेच्या दोन दिवसीय १८ व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार आणि सकल जैन समाज संघटनेचे अध्यक्ष डॉ. विजय दर्डा, बीजेएसचे अध्यक्ष शांतीलाल मुथा, अभिनेते आमिर खान, सत्यजित भटकळ, माजी मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, हेमंत रासने, सुनील कांबळे, योगेश टिळेकर, परिणय फुके, प्रशांत बंब, प्रकाश धारिवाल, गणपत चौधरी, विठ्ठल मणियार, विजय भंडारी, राजेंद्र लुंकड, वालचंद संचेती, राजेश मेहता, वल्लभ भन्साळी, राजेश जैन, डॉ. चैनराज जैन आदी उपस्थित होते.

जैन चळवळीने वाढविला समाजाचा आत्मविश्वास

सध्या जल, जंगल आणि जमीन याकडे लक्ष देण्याची गरज आहे. यातून देशातील बहुतांश समस्या दूर होतील. भारतीय जैन संघटनेने यात काम करण्याची गरज आहे. देशातील समस्या सोडविण्यासाठी जैन समाजाने पुढाकार घेतला आहे. शैक्षणिक आणि सामाजिक कामात शांतीलाल मुथा आणि भारतीय जैन संघटनेचे मोठे काम आहे.

- शरद पवार, ज्येष्ठ नेते

भारतीय जैन संघटना, पाणी व नाम फाउंडेशन यांच्या कामामुळे राज्यभर पाण्याबाबत जागृती निर्माण झाली आहे. आपण सध्याच्या व्यवस्थेत परिवर्तन करू शकू, असा आत्मविश्वासही या चळवळीने दिला आहे. त्यामुळे अशा चळवळींना प्रोत्साहन देण्याचे काम यापुढे सरकार म्हणून करत राहू.

- देवेंद्र फडणवीस, माजी उपमुख्यमंत्री

संघटनेच्या वतीने मागील ४० वर्षांत केलेल्या कामांचा आनंद आम्ही साजरा करत आहोत. संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी सुरुवातीला जैन समाजाची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन सामूहिक विवाह सोहळे आयोजित केले. त्यातून खर्च कमी झाला आणि अप्रतिष्ठा ही प्रतिष्ठेत रूपांतरित झाली. लातूर भूकंपादरम्यान मदतीसाठी सर्वात प्रथम लोकमत आणि भारतीय जैन संघटना धावून आली. या आपत्तीत व्यवस्थापन कसे करावे, याचे धडे शरद पवार यांनी दिले. त्या अर्थाने पवार हे आपत्ती व्यवस्थापनाचे जनक आहेत. आजवरच्या काळात संघटनेने अनाथ मुलांचे पुनर्वसन, शाळा उभारणी तसेच भावी जीवनासाठी मोठे काम केले आहे.

- डाॅ. विजय दर्डा, चेअरमन, ‘लोकमत’ एडिटोरियल बोर्ड व माजी खासदार 

तसेच अध्यक्ष, सकल जैन समाज संघटना शिक्षणात मूल्यवर्धन व्हावे

तीस वर्षांपूर्वी मी एका लेखातून भविष्यात पाणी विकले जाईल, असे लिहिले होते. आज तशी स्थिती आहे. त्यामुळे पाणी संवर्धन करण्याची गरज आहे. मी देखील त्यासाठी मोहीम चालविली आहे. ती तुम्ही पुढे नेण्याची गरज आहे. गावांतील तलावांचे खोलीकरण करून पुनर्भरण करणे आवश्यक आहे. संघटनेने देशातील १० जिल्ह्यांत अशी ३० हजार कामे केली आहेत, तसेच संघटनेने शिक्षणात केलेले काम मोठे आहे. शिक्षणात मूल्यवर्धन करत संघटनेच्या विचारांचा वारसा पुढे न्यायला हवा. शाश्वत विकासाच्या कामाला या नंतरच्या काळात पुढे नेण्याची गरज आहे, असे मत लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांनी यावेळी व्यक्त केले, तसेच अनेक मान्यवरांनी आपले विचार अधिवेशनात मांडले.

Web Title: Constitutional values are our strength says Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.