बांधकाम मंजुरीआधीच भूमिपूजन?
By Admin | Published: April 8, 2015 03:48 AM2015-04-08T03:48:18+5:302015-04-08T03:48:18+5:30
महापालिकेच्या विस्तारित इमारतीसाठी बांधकाम विभागाची परवानगी मिळण्याआधीच, या इमारतीसाठी घाई झालेल्या राष्ट्रवादीने पक्षाचे
पुणे : महापालिकेच्या विस्तारित इमारतीसाठी बांधकाम विभागाची परवानगी मिळण्याआधीच, या इमारतीसाठी घाई झालेल्या राष्ट्रवादीने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते इमारतीचे भूमिपूजन केले आहे. विशेष म्हणजे, या इमारतीच्या केवळ ‘पार्किंग’ला महापालिका प्रशासनाने मंजुरी दिली आहे. याचे पडसाद मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. या प्रकारास भाजपाचे सदस्य राजेंद्र शिळीमकर यांनी जोरदार आक्षेप घेतला. त्यानंतर पालिका प्रशासनाने या प्रकरणावर खुलासा केल्यानंतर, या वादावर पडदा पडला.
महापालिकेचा वाढता विस्तार पाहून पालिकेस प्रशासकीय कारभारासाठी; तसेच नवीन गावे समाविष्ट झाल्यानंतर वाढणाऱ्या कारभारासाठी पालिका भवनाच्या मागील बाजूस चार मजली विस्तारित इमारत बांधण्यात येणार आहे. त्यासाठी तब्बल ३४ कोटी रुपयांचा खर्च येणार असून, या कामासाठीची २४ कोटी रुपयांची निविदा २६ फेब्रुवारीला मान्य करण्यात येणार आहे. विस्तारित भूमिपूजन दोन दिवसांपूर्वी खासदार अनिल शिरोळे, पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. मात्र, त्यानंतर अनेक नागरिकांनी या इमारतीबाबत माहिती घेण्यासाठी पालिका प्रशासनाकडे विचारणा केली असता, नकाशांना अद्याप मंजुरीच देण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. याचे पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. भाजपा सदस्य राजेंद्र शिळीमकर यांनी सभा सुरू होताच, आपल्या प्रभागात बचत गटांसाठी काम करण्याची मागणी बांधकाम विभागाकडे मागितली असता, त्यासाठी फेऱ्या माराव्या लागतात आणि दुसरीकडे महापालिकेचेच बांधकाम आहे म्हणून त्यास मान्यता न घेताही प्रशासन मनमानी पद्धतीने काम करणार का, असा सवाल शिळीमकर यांनी उपस्थित केला. त्यातूनच या इमारतीसाठी मंजुरीच मिळाली नसल्याची बाब समोर आली.