सदनिकाधारकांच्या फसवणुकीप्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 08:59 AM2024-07-03T08:59:24+5:302024-07-03T09:00:02+5:30

यावेळी न्यायालयाने त्याला ५ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.....

Construction businessman Vishal Agarwal arrested in case of defrauding flat owners | सदनिकाधारकांच्या फसवणुकीप्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालला अटक

सदनिकाधारकांच्या फसवणुकीप्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालला अटक

पुणे : बावधन (खु) परिसरातील ७२ सदनिकाधारकांची फसवणूक केल्याप्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालसह त्याच्या अन्य साथीदारांविरोधात हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणात येरवडा कारागृहात असलेल्या अग्रवाल याला अटक करत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. पी. खंदारे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला ५ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी युक्तिवाद केला की, अग्रवाल हा बांधकाम व्यावसायिक असून, त्याने नॅन्सी ब्रम्हा को-ऑप. हौ. सो. लि. या सोसायटीतील ७२ सदनिकाधारकांना त्यांच्या सोसायटीसाठी कव्हर पार्किंग, ओपन स्पेस, ॲम्युनिटीज या सुविधांचे आमिष दाखवून फसवणूक केली आहे. त्यांच्याकडून वेगवेगळी रक्कम घेऊन नमूद केलेल्या सुविधा दिलेल्या नाहीत. अगरवाल व त्यांच्या अन्य साथीदारांनी स्वत:च्या आर्थिक फायद्याकरिता या जागेमध्ये इतर इमारती बांधून सदनिकाधारकांचा विश्वास संपादन करून आर्थिक फसवणूक केली.

हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा केल्याचे दिसून येत असल्याने अग्रवालकडे सखोल तपास करायचा आहे. सोसायटी बांधकाम करताना मंजूर नकाशा व त्यानंतरच्या नकाशामध्ये वेळोवेळी बदल करण्यात आला आहे. सोसायटीधारकांना मानीव अभिहस्तांतरण करून देणे बंधनकारक असतानाही ते करून देण्यास टाळाटाळ केली, यामागे त्यांचा हेतू काय होता. ७२ सदनिकाधारकांकडून घेतलेल्या रकमेचा कोठे वापर केला यासह अन्य मुद्द्यांचा तपास करायचा असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी जाधव यांनी केली.

Web Title: Construction businessman Vishal Agarwal arrested in case of defrauding flat owners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.