गुंठेवारीतील बांधकामे नियमित होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:09 AM2021-06-20T04:09:10+5:302021-06-20T04:09:10+5:30
पुणे : पालिकेच्या हद्दीतील गुंठेवारीमधील बांधकामे नियमित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याकरिता पालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीचा (डीसी रुल) ...
पुणे : पालिकेच्या हद्दीतील गुंठेवारीमधील बांधकामे नियमित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याकरिता पालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीचा (डीसी रुल) निकष लावला जाणार आहे. ही प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार असल्याची माहिती पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
राज्य शासनाने गुंठेवारी नियमितीकरणाबाबतच्या घेतलेल्या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी सुरू झालेली नाही. याबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे, अधीक्षक अभियंता युवराज देशमुख, राजेंद्र राऊत उपस्थित होते.
----
राज्य मंत्रिमंडळाने ६ जानेवारी २०२१ रोजी ३१ डिसेंबर २०२० पर्यंतची गुंठेवारीतील बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला होता. मार्चमध्ये झालेल्या अधिवेशनात त्याचा कायदा अस्तित्वात आला. पालिकेच्या स्थायी समितीकडूनही याबाबत निर्णय घेतला होता. परंतु, प्रशासनाकडून नियमितिकरणाची प्रक्रिया सुरु झालेली नाही.
-----
गुंठेवारीतील बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे घराचे हप्ते भरणे, गृहकर्ज मिळणे, ताबा मिळण्यात अडचणी येत आहेत. नागरिकांना या निर्णयाचा लाभच घेता येत नाही. त्यामुळे ही प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी केली आहे.
- चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजपा
-----
जी बांधकामे पालिकेच्या डीसी रुलनुसार पात्र आहेत. अशी बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया लवकर सुरू केली जाईल. उच्च न्यायालयाने २०१७ साली दिलेल्या निकालामुळे सरसकट गुंठेवारीमधील बांधकामे नियमित करता येत नाहीत. त्यासाठी राज्य शासनाकडून स्पष्टीकरण आवश्यक आहे.
- विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महानगरपालिका
---