बांधकाम साहित्याचे दर वाढले पण घरांचे दर स्थिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:28 AM2020-12-14T04:28:17+5:302020-12-14T04:28:17+5:30
पुणे : कोरोना आपत्तीत पुकारलेल्या लॉकडाऊनचा परिणाम हा घरांच्या किंमती कमी करण्यास काही ठिकाणी कारणीभूत ठरला असला तरी, या ...
पुणे : कोरोना आपत्तीत पुकारलेल्या लॉकडाऊनचा परिणाम हा घरांच्या किंमती कमी करण्यास काही ठिकाणी कारणीभूत ठरला असला तरी, या काळातील बांधकाम साहित्य निर्मिती बंद असल्याने बांधकाम साहित्याच्या दरात मात्र १५ ते २० टक्के वाढ झाली आहे़
शहरातील बांधकाम साहित्याच्या किंमतीबाबत घेतलेल्या आढाव्यामध्ये घरांच्या बांधकामामध्ये १५ टक्के सहभाग असलेल्या स्टीलचा भाव साधारणत: आजमितीला २५ ते ३० टक्क्यांनी वाढला आहे़ याला कारण स्टीलची होणारी मोठ्या प्रमाणातील निर्यात हे देखील आहे़ लॉकडाऊनपूर्वी स्टीलचे भाव पुण्यात ४० हजार रूपये प्रति टन होते, तर आज ते ५० हजार रूपयांच्या आसपास आहेत़ दरम्यान वाळू, विटांच्या दरात काहीसा फरक पडलेला नसल्याचे दिसून आले आहे़
लॉकडाऊनच्या काळात सिमेंट कारखान्यांमध्ये निर्मिती कमी होत असल्याने, निर्मिती खर्च (प्रॉडक्शन कॉस्ट) ही वाढला होता़ परिणामी लॉकडाऊनपूर्वी २७० ते २८० रूपये असलेले दर लॉकडाऊनच्या काळात शंभर रूपयांनी प्रती गोणी मागे वाढले गेले़ मात्र आजमितीला हे दर पुन्हा तीनशे रूपयांपर्यंत आले आहे़
सद्यस्थितीला बांधकाम साहित्यांच्या किंमती वाढल्या असल्या तरी, बांधकाम व्यावसायिकांना आहे त्या दराने साहित्य करणे खरेदी करणे भाग आहे़ ‘रेरा’ कायद्यानुसार लॉकडाऊनपूर्वी बुकिंग केलेल्या व्यक्तींना, आहे त्या दरात व वेळेत घरांचा ताबा देणे बंधनकारक आहे़ त्यामुळे सध्या बांधकाम साहित्य दर वाढले असले तरी पण घरांचे दर स्थिर राहिले आहेत अशी स्थिती बहुतांशी ठिकाणी पाहण्यास मिळत आहे़ तर काही ठिकाणी दोनशे ते तीनशे रूपये प्रति स्वेअर फूट दर कमी झाल्याचेही दिसत आहे़