'कृषिक'मध्ये ‘फार्म ऑफ द फ्यूचर’ची उभारणी, बारामतीत जागतिक दर्जाचे कृषी प्रदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 05:25 PM2024-01-12T17:25:05+5:302024-01-12T17:25:15+5:30
यंदा शेतकऱ्यांना नेदरलँड, चीन, अमेरिका, इस्रायल, ब्राझिल, स्पेन, इटली, जर्मनी, अफ्रिका, फ्रान्ससह जगातील २० देशांतील विविध एआय, सेन्सर व रोबोटिक तंत्रज्ञान बियाणे खते, औषधे, मशिनरी, पॉलीहाउस, लागवड तंत्रज्ञान, स्मार्ट टूल्स पाहण्याची नामी संधी उपलब्ध होणार आहे....
बारामती : येथील ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचालित कृषी विज्ञान केंद्रामार्फत ‘कृषिक’ हे जागतिकस्तरावरील शेतीविषयक प्रात्यक्षिके आधारित कृषी प्रदर्शन दि. १८ ते २२ जानेवारी कालावधीत आयोजन केले आहे. याबाबत संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी अधिक माहिती दिली.
यंदा शेतकऱ्यांना नेदरलँड, चीन, अमेरिका, इस्रायल, ब्राझिल, स्पेन, इटली, जर्मनी, अफ्रिका, फ्रान्ससह जगातील २० देशांतील विविध एआय, सेन्सर व रोबोटिक तंत्रज्ञान बियाणे खते, औषधे, मशिनरी, पॉलीहाउस, लागवड तंत्रज्ञान, स्मार्ट टूल्स पाहण्याची नामी संधी उपलब्ध होणार आहे. प्रदर्शनात देशातील पहिले फार्म ऑफ द फ्यूचरची उभारणी करण्यात आली आहे. मायक्रोसॉफ्ट व जगातील सर्वोत्तम ऑक्सफर्ड विद्यापीठ लंडन यांच्या सहकार्यातून - सेंटर ऑफ एक्सलंस फार्मवाइबच्या द्वारे ट्रस्टच्या प्रक्षेत्रावर कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), आयओटी, एआर, व्हीआर यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा कृषी क्षेत्रात वापर करून तंत्रज्ञान विकसित केले आहे. सेन्सर, ड्रोन, रोबोटीक्स, सॅटेलाइट मॅपिंग, रिमोट सेन्सिंग इ.
क्लस्टर आधारित प्रात्यक्षिक, भाजीपाला गुणवता केंद्र, नावीन्यपूर्ण शेती तंत्रज्ञान, लालभेंडी, त्याचे अत्याधुनिक वाण यामध्ये फुलकोबी, लाल मुळा, एक किलो वजनाचा कांदा करटोली, लांब वांगे, हॉपशूट, चिया, तुर्कस्थांची बाजरी, मिलेटचे जास्त उत्पन्न देणारे वाण निळे लाल केळी, विविध फळ पिके, रामभुतान, पिअर, पिच, प्लम, लिची, सफरचंद, अवाकाडो, ब्लुबेरी, रासबेरी, फुल पिके, चेरी, लाल फणस, रोजमेरी, थाईम, ऑरगॅनो, सेज, ॲस्परॅगस आदी पीक प्रात्यक्षिके पाहावयास मिळणार आहेत.
पीक संरक्षणाकरिता कापड आच्छादन तंत्रज्ञान व कमी खर्चिक नेट हाउस स्टेजिंगचे नवीन तंत्रज्ञान आधारित काकडी, कलिंगड, फुल पिके व भाजीपाला, नैनो तंत्रज्ञान आधारित खते, अवर्षण प्रवण भागातील विविध पिके, ॲग्रो फोरेस्ट्रीअंतर्गत मिलिया दुबिया, चंदन लागवड. नैसर्गिक शेती यामध्ये होमिओपॅथी तंत्रज्ञानाचा वापर करून किड, रोग व खते व्यवस्थापन, पशुपक्षी प्रदर्शन- पशुपक्षी प्रदर्शन आणि डॉ. आप्पासाहेब पवार अश्वप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
दि. २० आणि २१ जानेवारी रोजी अश्वप्रदर्शन नियोजन केले आहे या प्रदर्शनामध्ये मारवारी आणि भीमथडी देखणे, दिमाखदार व उत्तम प्रतीचे अश्व असतील. तसेच दि. १८ ते २२ दरम्यान पशु प्रदर्शनमध्ये संकरीत जर्सी, संकरित होल्सटीन फ्रीसियन गाईमध्ये दूध उत्पादन स्पर्धा तसेच उत्तम प्रतीच्या कालवडींचा हिरकणी शो आयोजित करण्यात येणार आहे. विविध जातींच्या गाई उदाहरणार्थ ३०-४० लिटर दूध उत्पादन देणाऱ्या संकरित होल्सटीन फ्रीसियन व संकरित जर्सी गाई, कालवडी, टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानाने तयार झालेल्या कालवडी पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच देशी गाई आणि म्हैशी पाहण्याची संधीसुद्धा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती पवार यांनी दिली.
...खुद्द बिल गेट्स यांनी घेतली दखल
मायक्रोसाॅफटच्या सहकार्याने कृषी विज्ञान केंद्रात सुरू असलेल्या विविध अत्याधुनिक भविष्यातील शेतीच्या यशस्वी प्रयोगाची दखल खुद्द बिल गेट्स यांनी घेतली आहे. बिल गेट्स त्यांच्या टीमच्या माध्यमातून येथील माहिती घेत आहेत. जगात भविष्यातील आधुनिक शेती विकसित करणारे बारामती येथील कृषी विज्ञान केंद्र हे जगातील दुसरे ठिकाण आहे, अशी माहिती कृषी विकास प्रतिष्ठानचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे यांनी दिली.