टेमघर धरण बांधताना भेगा बुजविण्याचे कामच नव्हते झाले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 09:24 PM2019-07-16T21:24:39+5:302019-07-16T21:26:44+5:30
साधारणपणे दगडी बांधकाम आणि सीमेंट कॉँक्रीटचा वापर करुन बांधलेल्या धरणांचे आयुष्य शंभर वर्षांचे मानले जाते. टेमघर धरणाचे आयुष्य अवघ्या एकोणीस वर्षांचे... त्यातही पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्यास २०१०-११ साली सुरुवात झाली.
पुणे : साधारणपणे दगडी बांधकाम आणि सीमेंट कॉँक्रीटचा वापर करुन बांधलेल्या धरणांचे आयुष्य शंभर वर्षांचे मानले जाते. टेमघर धरणाचे आयुष्य अवघ्या एकोणीस वर्षांचे... त्यातही पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्यास २०१०-११ साली सुरुवात झाली. धरण बांधतानाच अत्यंत महत्त्वाच्या ग्राऊटींगचे (भेगा बुजविणे) कामच केले नाही. तसेच, धरणासाठी क्रश सँडचा अशास्त्रीय पद्धतीने केलेल्या वापरामुळे काही वर्षांतच धरणातून धोकादायक पाणी गळती झाल्याची कबुली जलसंपदाच्या अधिकाºयांनी दिली.
कृष्णा खोरे लवादामधे महाराष्ट्राच्या वाट्याला ५९४ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी आले. पावणेसहा कोयना धरणे मावतील इतके हे पाणी होते. राज्याला हे पाणी २००० सालापूर्वी अडवायचे होते. अन्यथा पुन्हा पाणी वाटपाच्या नव्या सूत्राला सामोरे जावे लागले असते. त्यामुळे १९९६ साली कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना करुन अनेक धरणे बांधली. त्यातीलच टेमघर हे एक धरण. या धरणाचे काम २०० साली झाले. मात्र, त्याचे कामच निकृष्ट झाल्याने मोठ्या प्रमाणावर गळती झाल्याचे अधिकारीही मान्य करीत आहेत.
याबाबत माहिती देताना जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे म्हणाले, धरणाचे कामच निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यावेळी धरणा बांधताना नैसर्गिक वाळू उपलब्ध नसल्याने क्रश सँड वापरली. मात्र, या प्रकारच्या वाळूचा वापर करताना विशिष्ट पद्धतीच्या तंत्राचा वापर करावा लागतो. तो देखील केला नाही. धरणाचे काम झाल्यानंतर राहीलेल्या भेगा बुजविण्यासाठी ग्राऊटींग करावे लागते. ते कामही झाले नव्हते. धरणाचे ९८ टक्के काम पूर्ण झाल्यानंतर वन विभागाने त्यांच्या ७ एकर जमीनीबाबत आक्षेप घेत काम थांबविले. त्यामुळे अपुरे राहीलेले कामही करता आले नाही. त्याची देखभालही पुरेशा प्रमाणात झाली नाही. त्यामुळे धरणातील गळती वाढली.
देखभाल दुरुस्तीचा खर्च घेणार ठेकेदाराकडून
टेमघर धरणाची धरणाची ठेकेदार कंपनी श्रीनिवासा कन्स्ट्रक्शन, प्रोग्रेसिव्ह कन्स्ट्रक्शन आणि श्रीनिवासा-प्रोग्रेसिव्ह या भागिदार कंपनी मार्फत ही कामे झाली. आता,संबंधित कंपन्या अस्तित्वात नाहीत. त्यांच्या प्रवर्तकांवर न्यायालयात तीन दावे दाखल आहेत. सध्या, धरणाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी शंभर कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. त्या पैकी ५८ कोटी रुपयांची कामे झाली आहेत. मात्र, हा खर्च १४५ ते १५० कोटींवर जाईल. हा खर्च ठेकेदार कंपनीच्या प्रवर्तकांकडून वसूल करण्यात येईल, असे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांनी सांगितले.