पुणे जिल्ह्यात शौचालयांचे बांधकाम केवळ अनुदान व दाखल्यासाठीच; आजही 25-30 टक्के शौचालयाचा नाही वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 12:08 PM2020-12-21T12:08:57+5:302020-12-21T12:22:46+5:30
शासनाकडून संपूर्ण पुणे जिल्हा चार वर्षापूर्वीच हागणदारीमुक्त जिल्हा म्हणून घोषित.
सुषमा नेहरकर-शिंदे-
पुणे : शासनाने संपूर्ण पुणे जिल्हा चार वर्षापुर्वीच हागणदारीमुक्त जिल्हा म्हणून घोषित केला खरा पण, आजही तब्बल 25-30 टक्के लोक शौचालयाचा वापर करत नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. शौचायल नसलेल्या कुटुंबाला शासनाकडून देण्यात येणारे दाखले, विविध योजनांचा लाभ घेतला जात नाही. यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शौचालयांचे बांधकाम अनुदान व दाखल्यासाठीच झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यात कोल्हापूर नंतर स्वच्छ भारत अभियानांतर्गत सर्वाधिक चांगले काम पुणे जिल्ह्यात झाले आहे. यामुळेच सन 2017 मध्ये संपूर्ण पुणे जिल्हा हागणदारीमुक्त झाला आहे. राज्यात सर्वाधिक प्रगत जिल्हा म्हणून पुण्याचा नंबर लागतो परंतु या प्रगत पुणे जिल्ह्यात देखील प्रामुख्याने आदिवासी भागात, पाणी टंचाई असलेल्या गावांमध्ये शौचालयांचे बांधकाम केवळ शासनाकडून प्रत्येकी 12 हजार रुपयांचे अनुदान दिल्यामुळे व सध्या शौचालय नसलेल्या कुटुंबाला कोणताही दाखला अथवा योजनेचा लाभ दिला जात नाही. यामुळे शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. कागदोपत्री संपूर्ण पुणे जिल्हा हागणदारीमुक्त झाला असला तरी 25-30 टक्के केवळ कागदोपत्रीच वापरत असल्याचे समोर आले आहे.
पुणे जिल्ह्यात आदिवासी व दुर्गम भागात बहुतेक सर्व गावांमध्ये शौचालयांची शंभर टक्के बांधकाम पूर्ण झाली आहेत. परंतु या भागात ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी मिळणे कठीण असताना शौचालयासाठी पाणी कोठून आणणार असा मोठाच प्रश्न आहे. यामुळे आजही जिल्ह्यात काही गावांमध्ये शौचालये बांधलीत, पण वापर होताना दिसत नाही. तर मोठे नागरिकरण झालेल्या गावांमध्ये शौचालयासाठी जागा नसलेल्या व गरीब लोकांकडून देखील शौचालयाचा वापर होत नाही.
------
पुणे जिल्ह्यात सन 2004 पासूनच स्वच्छ भारत अभियानाचे काम सुरू आहे. सुरूवातीला काही वर्षे हागणदारीमुक्त गाव व शौचालय वापर हा लोकांसाठी चर्चेचा विषय होता. पुण्यासारख्या प्रगत जिल्ह्यात देखील शौचालयांचा वापर करण्यासाठी लोकांची मानसिकता बदलण्यासाठी प्रचंड प्रयत्न करावे लागले. परंतु गेल्या काही वर्षांत वाढते शहरीकरण आणि जनजागृतीमुळे ग्रामस्थांमध्ये शौचालयाचे, स्वच्छतेचे महत्त्व वाढले आहे.
- भाऊसाहेब पवार, माजी सरपंच हागणदारीमुक्त गाव कान्हेवाडी तर्फे चाकण, खेड
--------
-जिल्ह्यात एकूण महसुली गावे : 1877
- हागणदारीमुक्त झालेली गावे : 1877
--------
शौचालये बांधकामांची तालुकानिहाय संख्या
आंबेगाव - 44887, बारामती- 64609, भोर -32098, दौंड- 51490, हवेली- 96640, इंदापूर- 61417, जुन्नर- 64273, खेड- 53922, मावळ- 38257, मुळशी- 28109 पुरंदर- 35449, शिरूर- 53616, वेल्हा- 11344
पुणे जिल्हा एकूण - 636111
------------
बांधकाम प्रगतीपथावर असलेल्या शौचालय : १९९६