बांधकामाला पिण्याचे पाणी
By Admin | Published: March 28, 2016 03:27 AM2016-03-28T03:27:40+5:302016-03-28T03:27:40+5:30
पाणीटंचाई जाणवत असूनही सध्या शहरात ठिकठिकाणी घरांची बांधकामे सुरू आहेत. यातील काही बांधकामांसाठी महापालिकेकडून पुरविल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा वापर होताना
पुणे : पाणीटंचाई जाणवत असूनही सध्या शहरात ठिकठिकाणी घरांची बांधकामे सुरू आहेत. यातील काही बांधकामांसाठी महापालिकेकडून पुरविल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा वापर होताना दिसत आहे. महापालिकेकडून पाणी बचतीसाठी नागरिकांना आवाहन केले जात असताना बांधकामांसाठी सुरू असलेल्या पाण्याच्या वापराकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे एप्रिल-मे महिन्यात पुणेकरांना आणखी पाणी-टंचाईला सामोरे जावे लागू शकते.
धरणांतील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत चालल्याने शहरात सध्या दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. एप्रिल-मे महिन्यात आणखी पाणीटंचाई जाणवू शकते. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून पुरवठा केल्या जाणाऱ्या पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन केले जात आहे. त्यासाठी जलतरण तलाव, सर्व्हिसिंग सेंटरसाठी होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. बांधकामांसाठीही पिण्याच्या पाण्याचा वापर न करण्याच्या सूचना पालिकेने बांधकाम व्यावयायिकांना दिल्या आहेत. मात्र, शहराच्या विविध भागात सध्या सुरू असलेल्या काही छोट्या बांधकामांसाठी सर्रासपणे पिण्याच्या पाण्याचा वापर असल्याचे दिसत आहे.
याबाबत काही बांधकामांच्या ठिकाणांची पाहणी केली असता पिण्याच्या पाण्याचा वापर बिनदिक्कतपणे केला जात असल्याचे निदर्शनास आले. शहराच्या विविध भागांत दोन-तीन मजली घरांची बांधकामे सुरू आहेत. काही ठिकाणी संबंधितांनी बांधकामासाठी बोअरवेल घेतल्याचे दिसून आले. पालिकेकडून सध्या शहरात दिवसआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यानुसार पाणी आल्यानंतर बांधकामासाठी बांधलेली किंवा कायमस्वरूपी बांधकाम केलेली सिमेंटची टाकी भरून घेतली जाते. त्यानंतर त्या टाकीतील पाणी बांधकामांसाठी वापरण्यात येते. बांधकामांवर पाणी मारण्यासाठी या पाण्याचा वापर सढळ हाताने केला जात आहे. पूर्वी असलेल्या नळजोडणीचा त्यासाठी उपयोग केला जात आहे. टंचाईच्या काळातही बांधकामांसाठी पिण्याचा पाण्याचा सुरू असलेला बेसुमार वापर रोखण्यासाठी महापालिकेकडून तातडीने अशा बांधकामांचा शोध घेऊन कारवाई करण्याची गरज आहे.
शहराच्या विविध भागांत दोन-तीन मजली घरांची बांधकामे सुरू आहेत. काही ठिकाणी संबंधितांनी बांधकामासाठी बोअरवेल घेतल्याचे दिसून आले. पालिकेकडून सध्या शहरात दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. असे असताना एकीकडे पाण्याची टंचाई आणि दुसरीकडे पाण्याची उधळपट्टी केली जात आहे.