गवंडीकाम करणाऱ्या गिरीशची भारत श्री किताबाला गवसणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 04:59 PM2019-07-17T16:59:32+5:302019-07-17T17:04:22+5:30
जर मनात जिद्द असेल तर नशीबही आडवे येऊ शकत नाही या वाक्याची प्रचिती देणारा खेळाडू सध्या पुण्यात आहे.
पुणे :जर मनात जिद्द असेल तर नशीबही आडवे येऊ शकत नाही या वाक्याची प्रचिती देणारा खेळाडू सध्या पुण्यात आहे. घरची कोणतीही पार्श्वभूमी नसताना, गवंडीकाम काम करून त्याने आत्तापर्यंत पाच वेळा 'भारत श्री' हा मानाचा किताब पटकावला आहे. त्याची कहाणी सगळ्यांनाच प्रेरणादायी आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गिरीश दिनकर पावडे कुटुंबासह सुमारे ३० वर्षांपूर्वी नांदेड जिल्ह्यातून पुण्यातील खुळेवाडी झोपडपट्टीत राहायला आले. यावेळी दहा बाय दहाच्या खोलीत राहताना संपूर्ण कुटुंब बांधकाम मजूर म्हणून काम करत होते. एके दिवशी चंदननगर भागात व्यायामासाठी जाणाऱ्या काही मुलांनी त्यांना हिणवलं आणि त्या दिवसापासून त्यांनी व्यायामाला सुरुवात केली. घरात खायची आबाळ असताना त्यांना लागणाऱ्या खुराकाची काळजी घेणे तर शक्यच नव्हते. पण त्याही स्थितीत खचून न जाता त्यांनी कसरत सुरु ठेवली. त्यांना त्यासाठी काही मित्रांनी मदतही केली.
२००१ सालापासून त्यांनी पहिल्यांदा महाराष्ट्रभर विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि आजपर्यंत तब्ब्ल ११ वेळा महाराष्ट्र श्री किताब पटकावला आहे. हिमाचल प्रदेश-2016,दिल्ली-2015, हरियाणा-2013, आसाम-2014, तमिळनाड-2017 या राज्यांमध्ये “भारत श्री" किताब पटकविला आहे .मास्टर गटात दोन वेळा “भारत श्री "चा किताब पटकविला आहे. दुर्दैवाने त्यांचे घर अत्यंत लहान असल्यामुळे ही पदकेही पोत्यात भरून ठेवली आहेत. या कामगिरीमुळे त्यांनी एका जिममध्ये ट्रेनर म्हणून नोकरी मिळाली आहे. दोन वर्षांपासून गवंडीकाम बंद केले आहे.
या सगळ्या अनुभवाविषयी तो म्हणतो, ' अनेक वर्षांपासून हा प्रवास सुरु आहे. काहीवेळा अपयश आलं, नैराश्यही आलं पण त्यातूनही पुढे गेलो आणि त्यामुळेच इथंपर्यंत पोचू शकलो. अजूनही पुढे जायचे आहे, त्यासाठी मी कायम प्रयत्न करेन'.