बांधकाम कर्मचाऱ्यांना ओळखपत्रावर सोडावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:10 AM2021-04-15T04:10:10+5:302021-04-15T04:10:10+5:30
पिंपरी : गेल्या टाळेबंदीप्रमाणे बांधकाम प्रकल्पावर येणारे अभियंते, प्लंबर, इलेक्ट्रिशियन अशा व्यक्तींना कंपनीने दिलेल्या ओळखपत्रावर कामावर येण्यास मुभा द्यावी. ...
पिंपरी : गेल्या टाळेबंदीप्रमाणे बांधकाम प्रकल्पावर येणारे अभियंते, प्लंबर, इलेक्ट्रिशियन अशा व्यक्तींना कंपनीने दिलेल्या ओळखपत्रावर कामावर येण्यास मुभा द्यावी. अन्यथा काही दिवसातच काम ठप्प पडण्याची भीती बांधकाम क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र सरकारने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी एप्रिल महिना अखेरीपर्यंत टाळेबंदी जाहीर केली आहे. बांधकाम प्रकल्पावर राहणारे कामगार आणि बांधकामाचा कच्चा माल घेण्यासाठी बाहेर जाणाऱ्यांना मुभा देण्यात आली आहे. कामावरील कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस घेणे बंधनकारक आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकास अथवा विकसकास दहा हजार रुपयांचा दंड करण्यात येईल. त्या नंतरही नियमांचे उल्लंघन झाल्यास कोविड निर्बंध असेपर्यंत काम बंद ठेवावे लागणार आहे.
क्रेडाई पुणे मेट्रोचे माजी अध्यक्ष सुहास मर्चंट म्हणाले, बहुतांश बांधकाम मजूर प्रकल्पावर राहतात. मात्र, अभियंते, प्लंबर, इलेक्ट्रिशियन बांधकाम प्रकल्पाहून दूर अंतरावरून येणार. या व्यक्तींना परवानगी न दिल्यास काही दिवसात काम ठप्प पडेल. काम नसल्याने त्यांचा पगार थांबेल. बांधकाम क्षेत्रात दोन आठवडे काम थांबल्यास ते दोन महिने मागे जाते. नंतर या सर्व व्यक्तींची मोट बांधणे अवघड होते. याचा विचार करून पूर्वीप्रमाणे बांधकाम प्रकल्पावरील कर्मचाऱ्यांना कंपनीच्या ओळखपत्रावर सोडावे.
क्रेडाई पुणे मेट्रोचे विद्यमान अध्यक्ष अनिल फरांदे म्हणाले, बांधकाम प्रकल्पाजवळ ९० टक्के कामगार राहतात. बांधकाम प्रकल्पावरील ओळखपत्र दाखविल्यानंतर इतर कामगारांची अडवणूक न केल्यास काही अडचण येणार नाही.